भाजपमय वर्धा जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : स्वाभिमानी संघटनेचा अडथळा  पार करीत उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यासमोर आता त्यांच्या आईच्या विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे.

माजी राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या असलेल्या चारुलता टोकस यांची उमेदवारी अखेर जाहीर झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा जीव भांडय़ात पडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत काँग्रेस आघाडीच्या वाटाघाटी सुरू असतांना वर्धा मतदारसंघाची बाब ऐरणीवर आली होती. विदर्भात स्वाभिमानीने बुलढाणा व वर्धा या दोन जागेवर हक्क सांगितला होता. त्यापैकी बुलढाणा येथून राकॉने उमेदवार जाहीर केल्यानंतर वध्रेच्या जागेबाबत काथ्याकूट झाला. शरद पवार यांनी वध्र्याची जागा स्वाभिमानीला सोडण्याबाबत काँग्रेस अध्यक्षांकडे शब्द टाकण्याचे सूतोवाच केल्यानंतर काँग्रसजन स्तब्ध झाले होते. वध्र्याची जागा काँग्रेस सोडतेच कशी, असा प्रश्र कार्यकर्ते उपस्थित करीत होते. गांधीभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्हय़ात गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे पर्व साजरे होत असतांना काँग्रेसलाच येथून चले जाव कसे काय केले जाऊ शकते, अशी विचारणा केली जात होती. याच जयंतीपर्वाच्या पाश्र्वभूमीवर अ.भा. काँग्रेस समितीची बैठक सेवाग्रामला झाली होती. गांधी विरूध्द गोडसे अशी लढाई यापूढे लढण्याचे इथूनच ठरले असतांना वध्र्यात काँग्रेसला हरविणार काय, असे प्रश्र वरिष्ठ नेत्यांकडे उपस्थित करण्यात आले.

अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  टोकस यांना तिकिटाची दिलेली खात्री फळास आली. स्वत: टोकस तिकिट मिळण्याबाबत साशंक होत्या. पण काँग्रेस वध्रेची जागा सोडणार नाही. अशी खात्री त्या देत. तिकिट मिळाल्यानंतर आता त्यांच्या आईप्रमाणेच मोठी झुंज देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. १९९९ मध्ये काँग्रसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान निर्माण झाले होते. राकाँतर्फे  दत्ता मेघे यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर काँग्रसतर्फे  लढणार कोण, असा प्रश्र उद्भवला होता. त्यावेळी पक्षातील इतर नेते उत्सुक नसल्याने देवळी पुलगावच्या आमदार असलेल्या प्रभा राव यांना गळ घालण्यात आली. भाजपचे सुरेश वाघमारे व मेघे यांच्या विरूध्द झालेली लढाई राव यांनी अवघ्या सात हजार मताने जिंकली होती. ही वर्धा मतदारसंघातली एकमेव तिहेरी लढत ठरली. त्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात लढण्याचे मोठे आव्हान होते. आताही सत्ताधारी पक्षाचे खा. रामदास तडस यांचे अपेक्षित आव्हान चारुलतांसमोर आहे. जि.प., न.प. व ग्रामपंचायतीतील सत्तेमुळे वर्धा जिल्हा भाजपमय आहे. काँग्रेस खिळखिळय़ा अवस्थेत असून गटबाजी कायम आहे. त्यामुळे एकहाती ही लढाई लढण्याचे आव्हान टोकस यांच्यासमोर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 wardha constituency congress charulata tokas
First published on: 23-03-2019 at 01:55 IST