सोलापूर : एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा दिलेल्या उमेदवारीवरून तिढा सुटला नसताना इकडे सोलापूर राखीव मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून दररोज नवनवीन नावांची भर पडत आहे. यातून उमेदवारी माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता वरचेवर ताणली जात आहे. सोलापुरात मागील २८ वर्षांमध्ये भाजपचे पाच खासदार निवडून आल्याची पाश्वभूमी आहे. लिंगराज वल्याळ (१९९६), प्रतापसिंह मोहिते-पाटील (२००३ पोटनिवडणूक), सुभाष देशमुख (२००४) यांच्यासह ॲड. शरद बनसोडे (२०१४) आणि डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी (२०१९) यांनी खासदारकीची धुरा सांभाळली असताना त्यात अलिकडे सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवरील सत्ताही भाजपच्या ताब्यात गेली होती. सध्या या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार कार्यरत आहेत. अशा प्रकारे भाजपची घोडदौड सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीसह विरोधक विकलांग होत आहेत.

हेही वाचा >>> अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून मुलीस जन्माला घातले; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी 

या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा निर्णय लांबला आहे. त्यामागे इच्छुकांची झालेली भाऊगर्दी हे कारण असल्याचे सांगितले जाते. विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सध्या प्रलंबित आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणही उच्च न्यायालयात न्यायप्रवीष्ट आहे. मात्र तरीही ते पुन्हा खासदारकीसाठी पुन्हा इच्छूक आहेत. त्यांच्या अगोदरचे माजी खासदार शरद बनसोडे हेसुध्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देत रिंगणात उतरले आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, सनदी अधिकारी भारत वाघमारे, माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, संगीता जाधव यांच्यासह इच्छुकांची संख्या पन्नासच्यि घरात गेली असताना त्यात दररोज नवनव्या नावांची भर पडत  आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी आपणांस भाजपने सोलापूरच्या उमेदवारीसाठी विचारणा केल्याचा दावा केला असून त्यादृष्टीने मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघ परिवाराशी संबंधित असलेले उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे.