करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात सरकार फारसे गंभीर दिसत नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील करोना परिस्थितीसंदर्भातील सविस्तर आकडेवारी सादर करत आरोग्य व्यवस्थांची कमतरता असल्याचं म्हटलं आहे. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य व्यवस्थांच्या कमतरतेमुळे मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास सरकारविरोधातील रोष आणखी वाढेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात माहिती देणाऱ्या वल्डोमीटरचा हवाला देत प्रकाश आंबेडकर यांनी देशामध्ये २९ मे २०२१ पर्यंत २ कोटी ७७ लाख रुग्ण असल्याचं सांगितलं. यापैकी २ कोटी ५१ लाख रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. सर्व आकडेमोड करुन पाहिल्यास आवश्यक इतके बेड्स पुरवण्यात राज्य सरकारांना अपयश आल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ६० हजार रुग्ण सापडले. याची सरासरी पाहिली तर ३६ जिल्ह्यांमध्ये दिवसाला १६०० बेडची आवश्यकता होती. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात २३ हजार बेड्सची गरज असताना ही सेवा राज्य सरकारला देता आली नाही, असं आंबेडकर यांनी आकडेवारीसहीत सांगितलं.

हॉस्टेल, वेगवेगळ्या संस्था, रिकामे फ्लॅट्स अनेक ठिकाणी करोनासंदर्भातील सुविधा पुरवण्यासाठी घेता आले असते पण ते घेतले नाहीत, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भातील आकडेवारीच्या आधारे अंदाज व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी, “तिसऱ्या लाटेत प्रत्येक जिल्ह्याला ५० हजार बेड्स लागतील. लहान मुलांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जातं. लहान मुलांबरोबर आई वडिलांना ठेवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्यात?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या करोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झालाय. मात्र औषध मिळालं असतं तर तीन ते चार वर्षे जगले असते, असं सांगत राग व्यक्त केला जातोय मात्र त्याची दाहकता अधिक नाहीय. पण तिसऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास जनतेच्या संतापाची दाहकता अधिक असेल. तिसऱ्या लाटेमध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री हे मुंबईचे आहेत तर उपमुख्यमंत्री पुण्याचे. पुण्यामध्ये आठ हजार बेड्सची सोय केल्याचं त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं. ५० हजार बेड्सची गरज असतानाच आठ हजार बेड्स दिसतायत. तर परिस्थिती फारशी चांगली नाहीय असं म्हणावं लागेत, अशा शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सरकार करोना परिस्थितीसंदर्भात गंभीर असल्याचं दिसत नसल्याचा आरोप केलाय.

१३५ कोटी लोकांच्या देशामध्ये आपण तीन कोटी लोकांना आरोग्य सेवा देण्यास अपयशी ठरतोय. आपली परिस्थिती बांगलादेशपेक्षाही वाईट आहे. तिथे दर १० जणांमध्ये १६ बेड्स आहेत आपल्याकडे हाच आकडा १० जणांमागे सहा बेड्स इतका आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta drusthi ani kon with vanchit bahujan aaghadi prakash ambedkar talks about coronavirus situation scsg
First published on: 02-06-2021 at 18:00 IST