देशाला लागणाऱ्या प्रचंड ऊर्जेची गरज लक्षात घेऊन त्यावर सातत्याने प्रयोग, संशोधन करणाऱ्या, भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’, ‘सॉलिड स्टेट पॉवर अ‍ॅम्प्लिफायर’ तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचा (डीएई), सन्मानाचा ‘वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य पुरस्कार’ यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. मंजिरी पांडे आहेत यंदाच्या दुर्गा.

देश हा देव असे माझा’ हे ब्रीद मानून संशोधनाद्वारे देशसेवा करणाऱ्या दुर्गा आहेत ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’(बीएआरसी)तील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंजिरी पांडे. भविष्यातील ऊर्जानिर्मितीवर त्या काम करत असून भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी त्यांनी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’ आणि ‘सॉलिड स्टेट पॉवर अ‍ॅम्प्लिफायर’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या संशोधनातून देशाचे सुमारे  ५० कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.

डॉ. मंजिरी यांचे आई-वडील (विश्वनाथ आणि वासंती सदावर्ते) दोघेही मॅट्रिक. मात्र मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं हा त्यांचा ध्यास.

डॉ. मंजिरी यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर, १९९० मध्ये त्या ‘बीएआरसी’त रुजू झाल्या. नंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. ‘स्पेक्ट्रोमीटरसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी’ तंत्रज्ञान हे त्यांचे पहिल्या पाच वर्षांतले पहिले यश. हे तंत्रज्ञान ४-५ मोठय़ा उद्योगांना देण्यात आलंय.  

देशाला प्रचंड ऊर्जेची गरज आहे. ही ऊर्जा अणुभट्टय़ांतून (न्यूक्लियर पॉवर रिअ‍ॅक्टर) अणूंच्या विभाजनाने तयार होते. त्यासाठी लागणाऱ्या युरेनियम इंधनाचे साठे आपल्याकडे कमी आहेत. मात्र भारतात थोरियम विपुल प्रमाणात सापडतं. थोरियमला अणुभट्टय़ांसाठी इंधन म्हणून तयार करून, त्यापासून सुरक्षित व शाश्वत अणुऊर्जा तयार करण्यासाठी ‘एडीएस’ (एक्सलेटर ड्रिव्हन सबक्रिटिकल रिअ‍ॅक्टर सिस्टम्स) हे तंत्रज्ञान विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’ने हाती घेतली आहे.

यात दोन विभाग आहेत- एक अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) आणि दुसऱ्या त्वरक (एक्सलेटर) साठी डॉ. मंजिरी काम करतात. या प्रक्रियेत विद्युत व चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने प्रोटॉन्सना एक्सलेटरमध्ये प्रचंड वेग दिला जातो. त्यासाठी एक्सलेटरला बाहेरून शक्ती द्यावी लागते. ती शक्ती देणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान (विद्युत चुंबकीय तरंगांचा वापर केलेले) डॉ. मंजिरी यांनी विकसित केले आहे. सात-आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे तंत्रज्ञान २०२३ पासून कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आपला देश या तंत्रज्ञानात  स्वयंपूर्ण झाला आहे.

‘सॉलिड स्टेट पॉवर अ‍ॅम्प्लिफायर’ हे आणखी एक तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. पूर्वी सामान्य विद्युत वाहक-एक्सलेटरमध्ये काम सुरू होतं ते आता उच्च विद्युत वाहक-एक्सलेटर आल्यामुळे, त्यात सॉलिड स्टेट पॉवर अ‍ॅम्प्लिफायर तंत्रज्ञान वापरतात. सध्या याची शक्ती २० किलो वॅट आहे, ती वाढवत ५०० किलो वॅटपर्यंत नेण्याचा त्यांचा इरादा आहे.

गेल्या पाच वर्षांत विकसित झालेल्या या सर्व तंत्रज्ञानामुळे आपल्या परकीय चलनात प्रचंड बचत तर झालीच, शिवाय हे प्रगत तंत्रज्ञान आता आपल्या देशातही उपलब्ध आहे २०१४ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या देवाण-घेवाण करारानुसार, अमेरिकेला हे अ‍ॅम्प्लिफायर दिले आहेत. डॉ. मंजिरी यांच्या संशोधनाला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पावती होय.

रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा प्लाझ्मा आधारित र्निजतुकरणासाठीही उपयोग होतो. घन, द्रव व वायू या तीन अवस्थांवरची चौथी अवस्था म्हणजे प्लाझ्मा. अणू- रेणूंचे विघटन करून प्लाझ्मा तयार करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी पॉवर लागते. हे तंत्रज्ञानही डॉ. मंजिरी यांनी विकसित केले आहे. हे युनिट छोटे, इकडूनतिकडे सहज नेण्यासारखे आहे. केवळ

४ ते ५ मिनिटांत ठरावीक पृष्ठभाग किंवा वस्तू पूर्णपणे र्निजतुक करणारे हे उपकरण रुग्णालये, औषधांची दुकाने आणि घरांसाठीही उपयोगी आहे. हे तंत्रज्ञान उद्योगांना देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’तर्फे सुरू झाले आहे. एक शक्ती दुसऱ्या शक्तीत परिवर्तित करताना, ती कधीही पूर्णपणे होत नाही. ती परिवर्तित करणाऱ्या सध्याच्या उपकरणांची क्षमता ६५ टक्क्यांपर्यंत आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी शिक्षण संस्थांच्या मदतीने (पीएच.डी. प्रकल्प) त्यांचे काम सुरू आहे. ते पूर्ण झालं की, हे तंत्रज्ञान बाहेरून आणण्याची गरज भासणार नाही. हे संशोधन करताना

डॉ. मंजिरींना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. मुळात हे तंत्रज्ञान विकसित करताना त्याची रचना कशी असावी, त्यासाठी कोणते घटक वापरावे याची माहिती नव्हती. वाचन, वेगवेगळे प्रयोग करत त्याचबरोबर घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी हे यश मिळवले. त्यासाठी ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’च्या वरिष्ठांच्या सहकार्य व प्रोत्साहनाचा त्या आदरपूर्वक उल्लेख करतात. आणि अर्थातच पूर्ण कुटुंबाचाही.

डॉ. मंजिरी या ‘बीएआरसी’तील प्रशिक्षण विद्यालयात अध्यापिका व अभ्यासक्रम समन्वयक म्हणूनही काम पाहतात. त्यांचे ११० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचा (डीएई), सन्मानाचा ‘वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य पुरस्कार’ यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. भारताच्या ऊर्जा प्रकल्पात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. मंजिरी पांडे यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.

संपर्क

संपर्क क्रमांक:

०२२ ६९२९३८७८, ९८२०५५४२६८

 ईमेल आयडी:  manjiri08@gmail.com