काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने शिंदे यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. सव्वा वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला ज्योतिरादित्य यांनी मंगळवारी जोरदार धक्का दिला. शिंदे आणि त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार संकटात सापडले. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यामुळे लवकरच मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे ऑप्रेशन लोटस यशस्वी होऊन तेथे माजी मुख्यमंत्री शिवाराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेत येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. मध्य प्रदेशमधील या राजकीय भूकंपानंतर राज्यातही असाच प्रयोग घडू शकतो अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपानंतर मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले होते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजप नेत्यांनी स्वप्ने पाहू नयेत, असे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने राज्यातही मध्य प्रदेशप्रमाणे राजकीय उलथापालथ होईल का असा सवाल विचारला. “मध्य प्रदेशपाठोपाठ ‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रातही होईल का?”, असा सवाल ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या फेसबुक आणि ट्विटवर विचारण्यात आला होता. या प्रश्नावर १२ हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले.

फेसबुकवर ११ हजार ७०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवलं. त्यापैकी ६१ टक्के वाचकांनी म्हणजेच ७ हजारहून अधिक वाचकांनी, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ‘ऑप्रेशन लोटस’ यशस्वी होणार नाही असं मत नोंदवलं आहे. तर उर्वरित ४ हजार ७०० जणांनी महाराष्ट्रातही मध्य प्रदेशप्रमाणे भाजपा राजकारण करु शकते याबाजूने ‘होय’ असं मत नोंदवलं आहे.

ट्विटरवरही या प्रश्नावर एक हजार ३६७ जणांनी मत नोंदवलं आहे. त्यापैकी ५४.१ टक्के वाचकांनी नाही असं राजकारण महाराष्ट्रात होणं शक्य नसल्याचं मत नोंदवलं आहे. तर ४५.९ टक्के वाचकांनी मध्य प्रदेशमध्ये घडलं ते महाराष्ट्रातही होऊ शकतं असं मत नोंदवलं आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या चर्चा सुरु झाल्या असल्या तरी दुसरीकडे भाजपाने मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. ज्योतिरादित्य यांना कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांसहीत २२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात असले तरी या आधारावर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. आपल्याला किती आमदारांचे समर्थन आहे यासंदर्भातही भाजपाने कोणताच दावा अथवा वक्तव्य केलेलं नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात एका रात्रीत सत्ता स्थापन करताना झालेली चूक भाजपाला मध्य प्रदेशमध्ये करायची नसल्याने दिल्लीतील नेतृत्वाने आस्ते कदमची भूमिका घेतल्याचे समजते. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार गायब झाले होते त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील २२ काँग्रेस आमदार बेंगळुरुमध्ये आहेत. मात्र बंगळुरुमधील काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं आहे. “चिंता करण्याची काहीच गरज नाही. आम्ही बहुमत सिद्ध करू. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,” असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केलं आहे.

नवा सत्तासंघर्ष

काँग्रेसच्या बंडखोर २२ आमदारांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेचे संख्याबळ २०६ वर होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. अशा स्थितीत १०४ हा बहुमतासाठीचा जादुई आकडा ठरेल. काँग्रेसकडे अपक्ष वगळून ९२ आमदारांचे संख्याबळ उरेल. भाजपचे संख्याबळ मात्र १०७ आहे. दरम्यान, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारच्या बैठकीत अपक्ष आमदारांसह जवळपास १०० आमदार उपस्थित होते, असे एका मंत्र्याने सांगितले. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठकही मंगळवारी रात्री झाली. यामुळे मध्य प्रदेशात नवा सत्तासंघर्ष सुरू झाला असून, विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta poll will bjp succeed in operation lotus in maharashtra just like madhya pradesh scsg
First published on: 12-03-2020 at 15:35 IST