विज बिल प्रश्नी ऑनलाईन नोंदणीबाबत राज्य शासनाने २४ तासात घुमजाव केले आहे. या नोंदणीसाठी मुदतवाढ नसल्याचे स्पष्टीकरण वस्त्रोद्योग मंत्री कार्यालयाने गुरुवारी (१३ जानेवारी) केल्यानंतर राज्यातील यंत्रमाग कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. राज्यशासनाने आश्वासन देवून तोंडाला पाने पुसल्याची संतप्त प्रतिक्रिया यंत्रमागधारकांमध्ये उमटली.
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या दालनात बुधवारी (१२ जानेवारी) राज्यातील वस्त्र उद्योजकांची बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध अडचणी मांडण्यात आल्या. यंत्रमागधारकांना वीज बिल सवलतीबाबत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सुलभ पर्याय सुचवावेत, असे आवाहन शेख केले.
यावर उपस्थित यंत्रमाग धारकांच्या प्रतिनिधींनी विज बिल प्रश्न ऑनलाईन नोंदणी मंत्र्यांनी मुदतवाढीच्या आश्वासन दिले असल्याची माहिती माध्यमांना दिली. याला वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आक्षेप घेतला असून अशी मुदतवाढ नसल्याचे आज स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : “कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, शेतकऱ्यांना वीज बिलाला मुदतवाढ देण्यावर नितीन राऊतांचं वक्तव्य
वस्त्रोद्योग मंत्र्यांचा गैरसमज
या स्पष्टीकरणानंतर राज्यातील यंत्रमाग धारकांनामध्ये खळबळ उडाली. त्यांनी तातडीने वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे धाव घेतली. यड्रावकर यांनी निर्णयाच्या माहितीबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, असे स्पष्ट करून याबाबत मंगळवारी (१८ जानेवारी) पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले.