राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे अभ्यासक म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक असून या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोषाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड्.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.

मधुकर जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम’ कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘सार्थ तुकाराम गाथे’ची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी येथे सांगितले.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar joshi awarded dnyanoba tukaram award maharashtra government vinod tawde jud
First published on: 12-07-2019 at 19:05 IST