अलिबाग : महाड ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. वायू गळतीमुळे ही दुर्घटना घडली. कंपनीत झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले असून ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या पावडर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. यानंतर आगीचे आणि धुराचे लोट उसळण्यास सुरूवात झाली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. गॅस गळती आणि आगीचे व धुराचे लोट यांमुळे मदत व बचाव कार्यात अडचणी येत होत्या. संध्याकाळी उशीरापर्यंत मदत व बचाव कार्य सुरू होते. दुर्घटना घडली त्यावेळी कंपनीत एकूण ५७ कामगार काम करत होते. स्फोटाचा आवाज ऐकून यातील काही जण बाहेर पडले. मात्र कंपनीच्या आतील भागात काम करणारे कामगार आतच अडकून पडले होते. शर्थीचे प्रयत्न करून बचाव पथकांनी पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अद्यापही ११ कामगार बेपत्ता आहेत. हे सर्वजण कंपनीमध्येच अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.