राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना त्यांच्या पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवरून अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रासपाचं वेगळं समीकरण दिसणार का असा प्रश्न महादेव जानकरांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) पंढरपूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याला आले असताना माध्यमांशी बोलत होते.

महादेव जानकर म्हणाले, “पंकजा मुंडे माझ्या बहिण जरी असल्या, तरी त्या भाजपाच्या सहसचिव आहेत. त्यामुळे त्या भाजपातच राहणार आहेत. मी नाराज असल्याचा काहीच प्रश्न नाही. माझ्या चौकात, पश्चिम महाराष्ट्रात माझे किती आमदार आहेत? पंढरपूरला किती नगरसेवक आहेत? किती जिल्हा परिषद सदस्य आहेत? त्यामुळे मी नाराज नाही.”

“मला माझी लायकी वाढवली पाहिजे”

“मी माझ्या कर्तुत्वावर नाराज आहे. मला माझी लायकी वाढवली पाहिजे. तेव्हा महादेव जानकरला कोणताही पक्ष युती करायला विचारेल ना,” असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

२०१४ मध्ये सदाभाऊ खोत, रामदास आठवले आणि तुम्हाला बरोबर घेण्यात आलं. आता तुमचा कुठेच विचार केलेला दिसत नाही, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला.

व्हिडीओ पाहा :

“माझ्यामुळे भाजपा, काँग्रेसने मतदानच केलं नाही”

त्यावर महादेव जानकर म्हणाले, “मीही त्यावेळी काही मागायला गेलो नव्हतो. मी डिमांडर नाही, तर कमांडर आहे. ज्यावेळी माझे आमदार वाढतील, ताकद वाढेल, सभापती वाढेल तेव्हा माझंही महत्त्व वाढेल. आता माण पंचायत समितीला माझा सभापती झाला. माझी एकच जागा निवडून आली, तरी मी आलो म्हणून भाजपा, काँग्रेसने मतदानच केलं नाही.”

“मला भिष्माचार्यासारखं का वाटतं हे फडणवीसांना विचारा”

“पंकजा मुंडे भाजपाच्या आहेत आणि महादेव जानकर रासपाचा आहे. त्या माझ्या बहिण आहेत, मात्र, त्या मूळ भाजपाच्या आहेत. मला भिष्माचार्यासारखं का वाटतं हा प्रश्न माध्यमांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, जे. पी. नड्डा आणि नरेंद्र मोदींना विचारला पाहिजे,” असं मत जानकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : PM मोदींचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले, “पंकजा मुंडेच्या एका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या पक्षात कोणाला कुठे हे मी ठरवणार”

“प्रत्येक पक्षाची एक थिअरी असते. माझ्या पक्षात कोणाला कुठे हे मी ठरवणार, तसंच भाजपाचं आहे. त्यामुळे बहिण असली तरी पंकजा मुंडेंचा पक्ष वेगळा आहे. त्यांना कोणतं पद द्यायचं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर बोलणं योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपावर बोलणं टाळलं.