Mahadevi Elephant Reliance Jio News : कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी या गावातील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी (माधुरी) या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील ‘वनतारा’ या पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, हत्तीणीला नेल्यामुळे कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत आहेत. त्याविरोधात तीव्र जनभावना निर्माण होत असून अनेक गावांमध्ये आंदोलने केली जात आहेत. विरोधी पक्षांमधील नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं, मूक मोर्चे, स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूरकर त्यांची मागणी सरकार दरबारी देखील मांडत आहेत. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या कार्यवाहीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली. ज्यामध्ये अवघ्या ४८ तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असून त्यांचे सर्व अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले आहेत. तर, माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. शेट्टी यांनी रविवारी पहाटे बोचऱ्या थंडीत नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा काढली. यामध्ये सामान्य कोल्हापूरकर, सर्वपक्षीय नेते व महादेवीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सहभाग घेतला.
२५ हजारांहून अधिक लोकांनी सिम कार्ड बदलून घेतलं
दरम्यान, महादेवीसाठीचं हे आंदोलन केवळ इथपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली व बेळगावसह महाराष्ट्र व कर्नाटकमधील जनता सहभागी झाली आहे. वनतारा पशुसंवर्धन केंद्र हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या मालकीचं आहे. त्यामुळे कोल्हापूरकर रिलायन्स समुहाविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने रियान्स जिओला या आंदोलनाचा फटका बसत आहे. आंदोलकांनी दिलेल्या महितीनुसार आतापर्यंत कोल्हापूर व बेळगावमधील २५ हजारांहून अधिक लोकांनी त्यांचं जिओचं सिम कार्ड इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करून घेतलं (बदलून घेतलं) आहे.
आमदार राहुल आवाडेंचा जिओला रामराम
जिओविरोधातील आंदोलनाचा इतर टेलिकॉम कंपन्यांनी फायदा करून घेतला आहे. कोल्हापूर व बेळगावात अनेक चौकांमध्ये एअरटेल व व्ही (व्होडाफोन-आयडिया) कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सिम कार्ड विकण्यासाठी, जिओचं सिम कार्ड पोर्ट करून देण्यासाठी दुकानं थाटली आहे. या दुकानांसमोर लोकांच्या रांगा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे आमदार राहुल आवाडे यांनी देखील त्यांचं जिओचं सिम कार्ड पोर्ट करून घेतलं आहे.