सावंतवाडी: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दोन दिवसांचा पर्यटन आणि एका दिवसाचा शासकीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कुटुंबासोबत निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी दिल्या, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक घेतील.
११ आणि १२ ऑगस्ट रोजी मंत्री बावनकुळे यांनी पत्नीसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी आंबोली, वेंगुर्ले-उभा दांडा, आणि मालवण-तारकर्ली येथील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेतला. आंबोलीला ‘दक्षिण कोकणचे महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखले जाते. या खासगी दौऱ्यात त्यांनी सरकारी लवाजमा टाळला असला तरी, त्यांच्यासोबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. आंबोली येथे माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले.
आंबोली येथे स्थानिक प्रश्न आणि आश्वासन
आंबोली भेटीदरम्यान, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यासमोर कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न मांडला. आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर आणि माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी निवेदन देऊन या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
पर्यटन दौऱ्यानंतर उद्या १३ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासकीय कामकाजाला सुरुवात करतील. ते मालवण तारकर्ली येथून सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतील.