अहिल्यानगर : निसर्गातील रहस्य आणि सौंदर्य मनाला नेहमीच भुरळ घालतात. निसर्ग सौंदर्याची एक सुंदर निर्मिती म्हणजे राजकमळ. अमेझॉन जंगल हे मूळ उगमस्थान असलेली जगातील सर्वांत मोठी कुमुदिनी ‘व्हिक्टोरिया अमेझॉनिका’ अर्थात राजकमळ पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावाजवळच्या ‘आनंदवन’मध्ये फुलवण्यात निसर्गप्रेमींना यश आले. दीपावलीच्या मुहुर्तावर राजकमळ फुलण्याने निसर्गप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला.
या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्राच्या प्रकाशासोबत हळुहळु रात्री फुलत जाणारे हे राजकमळ परिसरात सुगंधाची उधळण करते. पहिल्या दिवशी पांढरीशुभ्र असलेली ही कुमुदिनी रंग बदलून गुलाबी होते. या कुमुदिनीच्या पानांचा आकार एवढा मोठा असतो की, त्यावर एक माणूस बसू शकतो. विशेष म्हणजे हे राजकमळ भारतात अगदी मोजक्याच ठिकाणी फुलण्यात यश आलेले आहे.
राजकमळच्या फुलण्याने आनंदवनाच्या जैवविविधतेत मोलाची भर पडली, असे जिल्हा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाचे अध्यक्ष तथा कमळ फुलांचे अभ्यासक जयराम सातपुते यांनी सांगितले. छोटे शेततलाव करून १०० लिटरच्या टबमध्ये रोपन करून राजकमळ फुलवण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या वर्षी आयोजित केलेल्या वनमहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. इंद्रजित देशमुख आणि तत्कालीन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते आनंदवनमध्ये या राजकमळाचे रोपण करण्यात आले होते. त्यावेळी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने उन्हाळ्यात त्याचे संवर्धन करणे कठीण होते. परंतु, अनेकांनी पुढे येत या रोपांची काळजी घेण्यासाठी पाणी उपलब्ध केले. या मेहनतीचे फळ म्हणजे राजकमळ फुलले.
जयराम सातपुते यांनी वर्षभर या कमळाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली आहे. या रोपासाठी लागणारे खते त्यांनीच उपलब्ध केली. सातपुते यांनी यापूर्वीही विविध प्रजातीचे कमळ व कुमुदिनी फुलवण्याचे प्रयोग यशस्वी केले आहेत. दीपावलीच्या मुहुर्तावर राजकमळ फुलण्याने निसर्गप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला.
आनंदवनमध्ये जैवविविधतेचे संवर्धन
वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मांडवे या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर लोकसहभागातून जैवविविधता वन उद्यान उभारले जात आहे. सन २०१७ ला कामाची सुरुवात झाली. आत्तापर्यंत २६ एकर परिसरात अनेक देशी वृक्षांचे रोपण व संवर्धन केले जात आहे. संकटग्रस्त आणि दुर्मीळ वनस्पतीचे जतन या ठिकाणी केले जात आहे. संदीप राठोड व नीता राठोड हे शिक्षक दाम्पत्य तेथे देखभाल करत आहेत.
