सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी आज, १७ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे आंतरराज्य पोलीस समन्वय बैठक पार पडली. दोन्ही राज्यांमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शांततेत आणि निर्धोकपणे पार पाडण्यासाठी, तसेच दोन्ही राज्यांमध्ये घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींची देवाण-घेवाण, पोलीस मदत आणि कारवाईमध्ये समन्वय साधण्याच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीला सिंधुदुर्ग आणि गोवा पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक: कु. नयोमी साटम, नॉर्थ गोवा पोलीस अधीक्षक श्री राहुल गुप्ता, बिचोली प्रभारी डीवायएसपी श्रीमती श्रीदेवी, याशिवाय, गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, आठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने मार्गदर्शन आणि सविस्तर चर्चा झाली.गुन्हेगारी आणि आरोपींची माहिती, गोवा व महाराष्ट्रात घडणारे विविध प्रकारचे गुन्ह्यांमध्ये ‘पाहिजे असलेले’ आणि ‘रेकॉर्डवरील’ आरोपींची देवाण-घेवाण व माहितीचे तत्काळ आदान प्रदान करण्यावर भर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
निवडणूक समन्वय: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने सीमेवरील बॉर्डर चेक पोस्टवर परस्परांना तातडीने सहकार्य करण्याबाबत सखोल चर्चा झाली.या बैठकीमुळे दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये समन्वय वाढून, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये शांतता राखण्यासाठी मदत होणार आहे.
