वेध विधानसभेचा
सतीश कामत, रत्नागिरी
गेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात पाचपैकी दोन जागा जिंकलेल्या आणि तिसऱ्या जागेवरील निसटत्या पराभवामुळे दबदबा निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी यंदाची विधानसभा निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई झाली आहे. तर संपूर्ण जिल्हा काबीज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
कोकण हा शिवसेनेचा १९९० पासूनचा परंपरागत बालेकिल्ला. २००४च्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्य़ातून पक्षाचे माजी आमदार भास्कर जाधव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दोन वजनदार नेते बाहेर पडल्याामुळे सेनेची पडझड झाली. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन जिल्ह्य़ांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार उदय सामंत व दीपक केसरकर यांना आपल्याकडे खेचत सेनेने परिस्थितीवर पुन्हा ताबा मिळवला आणि लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही या दोन जिल्ह्य़ांमध्ये मिळून ८ पैकी ५ जागा जिंकत वर्चस्व निर्माण केलं. त्या निवडणुकीत राणेंना पराभूत करत मागील दगा-फटक्याचा वचपा काढल्याचं समाधान शिवसेना नेतृत्वाला जरूर मिळालं. पण त्याच वेळी रत्नागिरी जिल्ह्य़ात जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवर ताबा असूनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सेनेला जेरीला आणलं. त्यामध्ये दापोली-खेड मतदारसंघातून संजय कदम आणि गुहागरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या विजयांमुळे पक्षामध्ये नवं चैतन्य पसरलं. त्याचबरोबर चिपळूण मतदारसंघातून शेखर निकम यांच्या निसटत्या पराभवामुळे ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ अशी ऊर्मी निर्माण केली. पण या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जाधव यांनी सेनेची वाट धरल्यामुळे त्या मतदारसंघावरील राष्ट्रवादीची पकड ढिली पडली आहे, तर खेड-दापोलीचे पक्षाचे आमदार कदम यांचीही चलबिचल चालू असून पक्षाने उमेदवारी दिली तरी सेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश यांच्यापुढे त्यांचा कितपत निभाव लागेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
या दोन मतदारसंघांपैकी खेड-दापोलीमध्ये रामदासभाईंचे पक्षांतर्गत विरोधक माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पुन्हा त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. विरोधकांची स्वत:च्या ताकदीपेक्षा त्यांच्यावरच जास्त भिस्त आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे उमेदवार उभा केल्याचाही फायदा मिळाला होता. या वेळी मात्र रामदासभाईंनी आधीपासूनच इतकी जोरदार तयारी केली आहे की, या दोन्ही बाबींचा विरोधकांना निर्णायक फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर एके काळचे पक्षांतर्गत विरोधक माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि स्वगृही परतत असलेल्या आमदार जाधवांशी त्यांनी आधीच जुळवून घेतलं आहे. त्यामुळे युवराज आदित्यच्या चमूमध्ये आपले चिरंजीव योगेश यांचा समावेश करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता बरीच वाढली आहे.
गेल्या दोन निवडणुका गुहागरमधून राष्ट्रवादीकडून जिंकलेले आमदार जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा करतानाच या जागेवरून पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच वेळी भाजपही जुना इतिहास सांगत या जागेवर दावा करत आहे. पण युती झाली तर पक्षश्रेष्ठी तो फार लावून धरण्याची शक्यता नाही आणि युती झाली नाही किंवा २००९ प्रमाणे या पक्षाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केली तरी आमदार जाधवांची स्वत:ची ताकद आणि सेनेच्या संघटनात्मक बळापुढेत्यांचा टिकाव लागण्याची शक्यता नाही.
चिपळूणवर लक्ष केंद्रित
या दोन मतदारसंघांच्या तुलनेत गेल्या निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी गेल्या पाच वर्षांत नव्या जोमाने कार्यरत राहून पक्षबांधणी केल्यामुळे याच मतदारसंघावर आता राष्ट्रवादीच्या विजयाच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही त्यांची लढत जवळची सोयरीक झालेले सेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी आहे. विजयाची हॅट्ट्रिक करू पाहात असलेल्या चव्हाणांबद्दल तक्रार करावी असं फारसं काही नसलं तरी आमदार म्हणून ते कामाची छाप पाडू शकलेले नाहीत. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना या मतदारसंघातून मिळालेली घसघशीत आघाडी याही निवडणुकीत कायम राहील, हीच त्यांच्या समर्थकांसाठी दिलासा देणारी एकमेव बाब आहे.
गेल्या जुलैत फुटलेल्या तिवरे धरणाचे कंत्रटदार, म्हणूनही आमदार चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्या तुलनेत गेल्या ५ वर्षांत निरानिराळ्या उपक्रमांद्वारे निकमांनी मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला आहे. विशेषत: कोकणातील पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घालत मतदारसंघात सुमारे पावणेदोनशे लहान-मोठय़ा पाणी योजनांची अंमलबजावणी केली आहे. त्यापैकी अनेक योजनांसाठी स्वत: निधी दिला आहे. त्यामुळे सध्या अन्य पक्षामधून राष्ट्रवादीमध्ये ‘इनकमिंग’ या एकमेव मतदारसंघात दिसून येत आहे.
रत्नागिरी मतदारसंघात सेनेचे आमदार उदय सामंत यांनी त्यांच्या खास शैलीत अशी पकड निर्माण केली आहे की, युती झाली नाही तरी येथील निवडणूक निकालावर काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. शेजारच्या राजापूर मतदारसंघातही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आमदार राजन साळवी यांनी चांगल्या प्रकारे पक्षसंघटन उभं केलं आहे. पण पक्षांतर्गत गटा-तटाच्या राजकारणाचा त्यांना थोडा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्य़ातील या ५ मतदारसंघांमध्ये सेनेचे उमेदवार अधिकृत घोषणेपूर्वीच कामाला लागले असताना विरोधी काँग्रेस आघाडीला चिपळूण वगळता अन्य ४ ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळण्याची वानवा आहे. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसचं येथे फारसं अस्तित्वही नाही, तर गेल्या निवडणुकीपर्यंत सेनेपुढेचांगलं आव्हान उभं केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर, आमदारांनीच सेनेची वाट धरल्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरी पक्षीय बलाबल
* खेड-दापोली राष्ट्रवादी
* गुहागर राष्ट्रवादी
* चिपळूण शिवसेना
* रत्नागिरी शिवसेना
* राजापूर शिवसेना
लोकसभा निवडणुकीतील विक्रमी विजयाची परंपरा विधानसभा निवडणुकीतही पुढे चालू राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील ५ पैकी ३ जागा आमच्याकडे राहतीलच. त्या व्यतिरिक्त या निवडणुकीत गुहागरमधून भास्कर जाधव आणि खेडमधून योगेश कदम या उमेदवारांमुळे तेथेही युतीसाठी पोषक वातावरण आहे. दापोलीत थोडी नाराजी असली तरी निवडणूक निकालावर परिणाम होण्याइतकी नाही. गुहागरमधून कोणी अपक्ष उभे राहिले तरी सेनेचं संघटनात्मक बळ आणि आमदार जाधवांमुळे ती लढतही आम्ही जिंकून या वेळी ५-० अशी निर्विवाद आघाडी घेऊ, अशी खात्री आहे. युतीमधील जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. पण दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सकारात्मक असल्यामुळे या निवडणुकीत युती कायम राहील, असे वाटते.
– विनायक राऊत, खासदार, सचिव, शिवसेना
शरद पवार यांनी ज्यांना मोठं केलं ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी, तर काही जण पराभवाच्या भीतीपायी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. या कठीण प्रसंगात त्यांनी पवारसाहेबांना साथ द्यायला हवी होती. पण पक्षाचे कार्यकर्ते हललेले नाहीत. निवडणुकीचं राजकारण बाजूला ठेवून गेल्या पाच वर्षांत चिपळूण तालुक्यात केवळ पाणी योजनाच नव्हे, तर टिकाऊ स्वरूपाची जलसंधारणाची कामं मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. ग्रामीण भागात त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आहेत.
– शेखर निकम, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस