राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठरवा जिंकला असून राज्यात यानंतर भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्तानाट्यावरदेखील दोन्ही गटातील नेते आजच्या अधिवेशनात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, बंडखोर गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या बंडावर भाष्य केले आह. आमचे हे बंड नसून आम्ही उठाव केला, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच हिंदुत्वाच्या विचारधारेवर पतण्यासाठीही आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. ते विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.

हेही वाचा >>> विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच त्याच्या जवळ जाऊन आदित्य ठाकरे म्हणाले, “तुम्ही असं…”

“आमच्यावर टीका केली गेली. तुम्ही बंडखोर झाले असे म्हणण्यात आलं. आम्हाला जे मिळालंय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाहीये. आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत न घेण्यासाठी या विचारावर आम्ही पुन्हा आलो आहोत. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. गुलाबराव तुला टपरीवर पाठवेन, असे म्हणण्यात आले. धिरुभाई अंबानीदेखील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> “…म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाहीत”;सुधीर मुनगंटीवारांचा जयंत पाटलांना खोचक टोला

“शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. टपरीवाला, चहा विकणारा, रिक्षावाला, टोपली विकणारा, पुंगानी वाजवणारा, ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वांना पुढे आणलं. बाळासाहेबांनी तुम्ही एक दिवस आमदार व्हाल असं आमचं प्रारब्ध लिहिलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले,” असेदेखील गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेना जे सोडून जातात ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं म्हणण्यात आलं. पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडून येण्याची चिंता करण्याची गरज नाही,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तसेच, शिवसैनिकांच्या विश्वासावर मी इकडे आलो आहोत, असे म्हणत ५५ आमदारांपैकी ४० आमदार कसे फुटतात? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.