भारतात करोनाच्या संसर्गाचा फैलाव वेगानं होत आहे. यामध्ये दररोज नवे बाधित रुग्ण आणि मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि केरळ ही राज्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे देशात ही दोन राज्ये करोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांपैकी मुंबई आणि पुणे ही दोन शहर करोना संसर्गाची हॉटस्पॉट बनली आहेत. मुंबईत सोमवारी अनेक नवे लोक करोना संक्रमित आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने वरळीचा कोळीवाडा आणि गोरेगावला हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. मुंबईत आजवर करोनामुळं ८ लोकांचा मृत्यू झाला असून १६७ जणांना लागण झाली आहे. तर पुण्यात एकाचा मृत्यू झाला असून ३४ बाधित पुणे शहरात आणि १२ बाधित पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आले आहेत.
राज्यात आजपर्यंत ३३८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यांमध्ये दहा लोकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात पहिल्यांदा दोन करोनाबाधित रुग्ण पुण्यात ९ मार्च रोजी आढळून आले. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. दरम्यान, राज्यातील ३५०० लोकांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना वेगळं राहण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये परदेशातून परतलेल्या लोकांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या २,२१६ नागरिक निरिक्षणाखाली आहेत.
दरम्यान, निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागामधील १८२ जणांची यादी मिळाली असून यातील १०६ जण सापडले आहेत. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.