Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल ९९.९५ टक्के

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.

SSC Board Result 2021, Maharashtra Board Result 2021
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची लेखी रद्द करण्यात आली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

राज्यातील नऊ विभागांचा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.

इयत्ता १०वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर २० टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना गुणपत्रक दिले जाईल जे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शाळांमधून दिले जाऊ शकते.

Live Blog

14:21 (IST)16 Jul 2021
वेबसाईट क्रॅश

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचण येत आहे.

13:27 (IST)16 Jul 2021
९९.९५ पास… अरे निकाल आहे की डेटॉल? अन् ती ०.०५ नापास झालीच कशी?; पाहा व्हायरल मिम्स

एकीकडे जवळजवळ सगळेच उत्तीर्ण झाले असतानाच ०.०५ टक्के पोरं नक्की आहेत तरी कोण आणि ती एवढी सूट देऊनही नापास कशी झाली यासंदर्भातील मिम्स व्हायरल झालेत. पाहुयात असेच काही मजेदार मिम्स… येथे क्लिक करुन पाहा फोटोगॅलरी

12:31 (IST)16 Jul 2021
राज्यातील नऊ विभागांचा निकाल खालीलप्रमाणे-

कोकण विभाग- १०० टक्के

अमरावती विभाग- ९९.९८ टक्के

मुंबई विभाग- ९९.९६ टक्के

पुणे विभाग- ९९.९६ टक्के

नाशिक विभाग- ९९.९६ टक्के

लातूर विभाग- ९९.९६ टक्के

कोल्हापूर विभाग- ९९.९२ टक्के

नागपूर विभाग- ९९.८४ टक्के

11:53 (IST)16 Jul 2021
यंदाही निकालात मुलींनी मारली बाजी; ९९.९६ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के आहे. विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ टक्क्यांनी जास्त आहे.

11:50 (IST)16 Jul 2021
राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा १०० टक्के निकाल

राज्यातील २२ हजार ७६७ शाळांमधून १६ लाख ५८ हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

11:44 (IST)16 Jul 2021
Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे. निकाल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

11:38 (IST)16 Jul 2021
दहावीच्या निकालात कोकणाची बाजी; विभागाचा १०० टक्के निकाल

राज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल १०० टक्के लागले आहे.

11:29 (IST)16 Jul 2021
९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ५ टक्के जास्त विद्यार्थ्यांना यावेळी १०० टक्के गुण मिळाले आहेत. २०२१ च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

11:26 (IST)16 Jul 2021
दहावीचा निकाल ९९.९५ टक्के

एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल हा ९९.९५ टक्के लागला असून गेल्या वर्षीपेक्षा ४ टक्के वाढ निकालात झाली आहे.

11:17 (IST)16 Jul 2021
२०२० मध्ये ९५.३० टक्के लागला होता दहावीचा निकाल

मागील वर्षांत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १८.२० टक्क्यांनी वाढ झाली होती. मार्च २०२० च्या परीक्षेत आलेल्या उमेदवारांची एकूण उत्तीर्णता टक्केवारी ९५.३० टक्के होती. या वर्षीच्या निकालाबाबत सगळ्यांना उस्तुकता असणार आहे

11:15 (IST)16 Jul 2021
विद्यार्थ्यांना मूल्यांकन निकषानुसार देण्यात येणार गुण

नववी आणि दहावीच्या गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आलं आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे

11:13 (IST)16 Jul 2021
११ वीच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थींना देता येणार सीईटी परीक्षा

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले होते की, “दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य बोर्ड किंवा परीक्षा परिषद विद्यार्थ्यांना सीईटी पोर्टलवर नोंदणी करण्याचा पर्याय देण्यात येईल.” सीईटी परीक्षेच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra board ssc 10th result 2021 live updates 10 result to be released today at 1 pm abn