Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली होती. पण, आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावीसाठी यंदा पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे.
तर यावर्षीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त आहेत याचीही उत्सुकता तुमच्या मानत असेल ना? तर याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… यावर्षीच्या निकालात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील जास्त आहेत. लातूर विभागात एकूण ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत, ज्यामुळे हा जिल्हा अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये ४० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
१०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे (Students With Perfect 100 % Score In SSC 2025)
पुणे: १३
नागपूर: ३
छत्रपती संभाजीनगर: ४०
मुंबई: ८
कोल्हापूर: १२
अमरावती: ११
नाशिक: २
लातूर: ११३
कोकण: ९
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे. माध्यमिक शालांत परीक्षा एकून ६२ विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच यंदा फेरपरीक्षेचा अर्ज १५ मे २०२५ पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परिक्षा २४ जूनपासून सुरु होईल.