उस्मानाबादच्या तीन जावयांना मंत्रिमंडळात स्थान
रवींद्र केसकर, उस्मानाबाद</strong>
माजी पालकमंत्री तानाजी सावंत हे शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार समजले जात होते. मात्र, सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ऐनवेळी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असूनही एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. मात्र, उस्मानाबादच्या तीन जावयांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यांच्याकडूनच जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय नाटय़ घडत राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी झाला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शून्यावर आली. शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. परंडा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना पहिल्यांदा पराभूत करून विजयी झालेले तानाजी सावंत यांना मागील कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान देऊन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात सुरूंग लावत आमदारकी पटकावली. त्यामुळे तानाजी सावंत पुन्हा पालकमंत्री होणार, अशा जाहिरातीचे फलक ठिकठिकाणी लावले जात होते. भावी पालकमंत्री, भावी कॅबिनेटमंत्री, अशी समाजमाध्यमावर होणारी चर्चा अखेर सोमवारी थांबली. तिसऱ्यांदा विजयी झालेले उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि पहिल्यांदा आमदार झालेले उस्मानाबादचे कैलास पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
तीन जावई मंत्री, सासरवाडीत आनंद
उस्मानाबाद तालुक्यातील तेरचे जावई असलेले अजित पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर उपळ्याचे जावई असलेले राजेश टोपे आणि ढोकीचे जावई असलेले प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यांच्याकडूनच आता जिल्ह्याच्या आशा वाटू लागल्या आहेत. पालकमंत्रीपद नेमके कोणाला जाणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.