CM Devenda Fadnavis Said, Many Times, People Felt that I Was Turning To Ashes, But I Soared High: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मराठी पत्रकार संघातर्फे ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “अनेक लोकांना वाटलं की, माझी राख होत आहे, पण तेवढ्यात मी भरारी घेतली.” त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द आणि राजकारणात आलेल्या कठीण परिस्थितीवर भाष्य केले.

दरम्यान, श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. यातील पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट सकारात्मकता. तुम्हाला सिक्रेट सांगतो, मी चिडलेलो आहे, असं तुमच्या लक्षात आलं, तर समजायचं की मला भूक लागली आहे. मला जेव्हा भूक लागते, तेव्हाच चिडतो. मला काही खायला दिलं की शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे, हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंच काम माझ्याकडे आलं, की ते सकारात्मकतेने करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या पुरस्काराला ‘फिनिक्स’ नाव दिलं आहे. पण मी काही राखेतून उभा झालेलो नाही. पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की, माझी राख होत आहे, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरे गेलो आणि त्यांचा सामना केला. माणसं झुंजवली नाहीत, त्यांचा द्वेष केला नाही आणि टोकाचं राजकारणही केलं नाही. यामुळेच या कठीण परिस्थितीत मी एकेक पाऊल पुढे जात गेलो.”

दरम्यान, २०१४ मध्ये १५ वर्षांनी युतीचे सरकार आल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यावेळी एकत्र असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी स्थापन केल्यानं फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. पुढे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. पण, त्यावेळीही भाजपा श्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. पण, पुढे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणीवस पुन्हा मुख्यमंत्री झाले.