Maharashtra Political Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडलं आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या या राजकीय भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला बसला आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीची घटना ताजी असताना महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रात आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे १६ ते १७ आमदार संपर्कात आहेत, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “मला अजित पवारांची मानसिकता राज्याला सांगायचीय, काकाला गिळून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल!

आणखी एक सत्तेत येईल. काँग्रेसचे १६-१७ आमदार संपर्कात आहेत, असं बोललं जातंय, यामध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हेही तेवढंच सत्य आहे.”

हेही वाचा- मोठी अपडेट: शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या ‘त्या’ आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल,” असंही शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या विधानामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का? आणि काँग्रेसमधील कोणता गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.