राज्यातील करोना संसर्ग प्रसाराचा वेग मंदावला असला, तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून येत असून, अनेक जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. करोनाच्या उद्रेकामुळे बारामती व सातारा जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही कडक लॉकडाउनची लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याची माहिती दिली.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील करोना परिस्थितीची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून, ती आटोक्यात आणण्यासाठी आता लॉकडाउन हाच एकमेव पर्याय असल्याचं अधोरेखित करत त्यांनी लॉकडाउनच्या निर्णयाची घोषणा केली.

जयंत पाटील म्हणाले,”काल (३ मे) सांगली जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या १,५६८ वर पोहोचली, तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय. प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी ५ मे रोजी (बुधवार) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाउन लावला जाईल,” असं पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला करोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा!,” असं आवाहन जयंत पाटील यांनी नागरिकांना केलं आहे.