कोल्हापूर : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात स्वतःची अजय शिर्के अकादमी पुण्यात सुरू करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरू करण्यात येणार आहेत,असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी येथे सांगितले.कोल्हापूरमध्ये क्रिकेटसाठी जागा देण्यासाठी सकारात्मक असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा भविष्यात या जागेवर विभागीय अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना पवार यांनी येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पहिल्या हंगामातील उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघाचाही समावेश असल्याचे सांगितले.