Eknath Shinde X Account Hacked: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट आज सकाळी हॅक करण्यात आले होते. हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तान आणि तुर्कियेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली. तसेच एक व्हिडीओही पोस्ट केला होता. मात्र काही मिनिटांतच या पोस्ट डिलीट करून अकाऊंट सुरक्षित करण्यात आले. इस्लामिक देशांशी संबंधित पोस्ट थेट उपमुख्यमंत्र्यांच्या अकाऊंटवर शेअर झाल्यामुळे हा सायबर हल्ला असल्याचे मानले जात आहे.
आज आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. हे अकाऊंट कसे हॅक केले गेले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अकाऊंटवर पाकिस्तान आणि तुर्किये देशाचा झेंडा असलेली एक पोस्टही शेअर झाली होती. ही माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच दोन्ही पोस्ट डिलीट करत अकाऊंट रिकव्हर करण्यात आले. मात्र राज्याच्या मोठ्या नेत्याचे अकाऊंट अशाप्रकारे हॅक करून त्यावर पाकिस्तान, तुर्किये देशांशी संबंधित पोस्ट शेअर केल्या गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कियेने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तसेच आपले ड्रोन्सही त्यांना पुरविले होते.
दरम्यान या घटनेचा तपास आता सायबर विभागाकडून करण्यात येत आहे. ज्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या गेल्या, त्याचे आयपी ॲड्रेस तपासले जात आहेत. तसेच एक्स अकाऊंट हॅक करण्यामागे कोणता हेतू होता? याचाही तपास केला जात आहे.