मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूणमध्ये; नारायण राणे, देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Maharashtra Flood update : पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे.

Maharashtra floods LIVE updates mumbai rains landslides CM Uddhav Thackeray visit flood-affected areas Raigad Ratnagiri Konkan
राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसला आहे. आता पुराचं पाणी ओसरू लागलं असून, या भागांत मदतकार्याला वेग आला आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली. दरम्यान, पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

सलग तीन दिवस थैमान घातलेल्या पावसानं राज्यात आता उसंत घेतल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला असला, तरी कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं, तरी आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. रायगडमध्येही भूस्खलन झालेल्या ठिकाणी पाऊसाने विश्रांती घेतल्यानं मदतकार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुरग्रस्त भागातील परिस्थिती संथगतीने पूर्वपदावर येताना दिसत असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

तिन्ही नेते पुरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. दहा वाजेच्या सुमारास तिन्ही नेते कोकणाच्या दिशेने रवाना झाले. नारायण राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत”, असं राणे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पुराचा फटका बसलेल्या चिपळूणला भेट देणार आहेत. सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना झाले. मुख्यमंत्री ११.३० वाजता चिपळूणमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra flood update cm uddhav thackeray devendra fadnavis narayan rane visit flood area chiplun taliye bmh