मुंबई- नागपूरमध्ये हिंगणा तालुक्यात लाडगाव- गोधडी गावांच्या परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या नव्या नागपूरमधील आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्रासाठी(आयबीएफसी) आवष्यक भूसंपादनासाठी तीन हजार कोटींच्या कर्जास थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सरकारने हुडकोडून तीन हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास परवानगी दिली आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नवीन नागपूर प्रकल्पांर्गत शहराभोवती बाह्य वळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट (ट्रक ॲण्ड बस टर्मिनल) विकसित करण्यात येणार आहेत. शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या अमरावती राष्ट्रीय महामार्ग, हिंगणा राज्यमार्ग, समृध्दी महामार्ग, हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग, उमरेड राष्ट्रीय महामार्ग, भंडारा राष्ट्रीय महामार्ग, भोपाळ राष्ट्रीय महामार्ग, काटोल राष्ट्रीय महामार्ग, जबलपूर राष्ट्रीय महामार्ग या सर्व महामार्गांना जोडणारा नागपूर शहराभोवतीचा सुमारे १४८ किलोमीटर लांबीचा व १२० मीटर रुंदीचा बाह्य वळण मार्ग व चार ठिकाणी ट्रक व बस टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे.
या बाह्यवळण रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग व इतर जिल्ह्यांतून नागपूरकडे येणारी तसेच नागपूर शहरातून समृध्दी महामार्गाकडे होणारी अवजड वाहतूक रहिवासी क्षेत्राच्या बाहेरून परस्पर वळविणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पास महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे प्राधिकणाच्या माध्यमातून हिंगणा तालुक्यातील गोधणी (रिठी) व लाडगांव (रिठी) येथील ६९२.०६ हेक्टर जागा जागा संपादीत करून तेथे सार्वजनिक हितार्थ नविन नागपूर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे.
हजारो कोटी रुपये खर्चाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ लि. (हुडको) ६ हजार ५०० कोटी इतके कर्ज घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भूसंपादनासाठी तीन हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या कर्जाची परतफेड करण्याची दबाबदारी प्राधिकरणावर टाकण्यात आली आहे.
