राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये सुरु असलेल्या वादात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने राज्यपालांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला आहे. राज्यपाल देहरादूनला जात असताना हा प्रकार घडला आहे. यानंतर राज्यपालांनी खासगी विमानाने प्रवास केला असं वृत्त एएनआयने दिलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाणार होते. देहरादूनला जाण्यासाठी राज्यपाल मुंबई विमानतळावर पोहोचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे राज्यपालांना पुन्हा परतावं लागलं. दरम्यान यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.
Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go to Dehradun today by a state govt plane However when Governor reached Mumbai Airport, he was told that permission to fly him in that plane has not been given. He has now booked a commercial flight to Dehradun.
— ANI (@ANI) February 11, 2021
फडणवीसांची टीका
“अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
आणखी वाचा- “आता पार अमेरिका सल्ला देऊ लागली,” भीमा कोरेगाव प्रकरणावरुन अजित पवारांची प्रतिक्रिया
“या सरकारएवढं अहंकारी सरकार मी पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार आणणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नसून राज्याची आहे. ज्याप्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे ते पाहता महाराष्ट्रात यासारखं सरकार आम्ही याआधी पाहिलेलं नाही. पोरखेळ लावला आहे. रस्त्यावरची भांडणं असल्यासारखं राज्य सरकार वागत आहे. यामुळे राज्यपालांचं काही वाईट होणार नाही, पण राज्याची प्रतिमा मलीन होत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. “जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.
आणखी वाचा- राज्यपालांना विमानातून उतरवल्याने फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले…
मुनगुंटीवारांची टीका
राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना केली आहे. राज्य सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडून हे घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.