महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे असं त्यांनी ठरवलं आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राज्यपालांनी पत्रात?

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं जुनं नातं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की छत्रपती शिवाजी हे महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत. नव्या काळातले आदर्श नितीन गडकरी आहेत. या त्यांच्या वक्तव्यावरून बराच गहजब झाला होता. मात्र त्यांनी महापुरूषांचा अपमान करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधीही महाराष्ट्रात त्यांनी अनेक महापुरूषांचा अपमान केला. छत्रपती शिवरायांबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात डिसेंबर महिन्यात महामोर्चाही काढला होता. तसंच डिसेंबर महिन्यात नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेतला होता.

राज्यपालांनी मुंबईबाबत काय वक्तव्य केलं होतं ?

कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की गुजराथी आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही. या त्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली होती ज्यानंतर राज्यपालांनी माफी मागितली.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य


महाविकास आघाडी सरकार राज्यात असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं होतं तेव्हा ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर पुढे या वयातली मुलं काय करतात हे विचारत ते हसले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

छत्रपती शिवरायांविषयींचं वक्तव्यही वादग्रस्तच

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता? राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

आता याच राज्यपालांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांनी राजीनामा द्यावा ही मागणी होत होती. उद्धव ठाकरे, अजित पवार अशा सगळ्यांनीच ही मागणी केली होती. मात्र त्यावेळी काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता राज्यपालांनीच सरकराला पत्र लिहून विनंती केलयाची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor bhagatsinh koshyari is ready to resign expressed his wish to pm modi scj
First published on: 23-01-2023 at 15:46 IST