शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्‍याच्या दृष्टीने टॅबमधील वैशिष्ट्ये आणि विद्यार्थ्यांना त्यांचा कसा उपयोग करुन देता येईल, याचा सविस्तर अभ्यास करुन अधिवेशनामध्ये याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विनोद तावडे यांची विधान भवनात भेट घेतली. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रम एक टॅबमध्ये समाविष्ट करण्यात यावा, या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या टॅबचा संच आदित्य ठाकरे यांनी विनोद तावडे यांना भेट दिला. या टॅबमध्ये असलेली वैशिष्ट्ये ठाकरे यांनी तावडे यांना सांगितले.
त्यानंतर पत्रकारांना तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी व्हावे या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेने निवडणूक वचननाम्यामध्ये दिले होते. त्यानुसार शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने मुंबईमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा उपक्रम सुरु केला. याच उपक्रमांतर्गत आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन टॅबची वैशिष्ट्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये टॅब कसा उपयोगी होऊ शकतो, जेणेकरुन दप्तराचे ओझे कमी होऊ शकेल, याची माहिती तावडे यांना दिली. या टॅबमध्ये महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक महामंडळ निर्मित आठवीच्या पाठयपुस्तकांच्या सॉफ्ट कॉपीज समाविष्ट केले असून यामध्ये सर्व विषयांवरील प्रश्नोत्तरांसहित संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅबची सुविधा सुरु करावी, या दृष्टीने आम्ही सकारात्मक आहोत. या संदर्भात अभ्यास करुन येत्या काळात अधिवेशनामध्ये याबाबत विचार करु, असे सांगताना तावडे म्हणाले की, हा टॅब इंटरॲक्टीव्ह स्वरुपाचा आहे. टॅब हा ऑडिओ व्हिज्युअल स्वरुपाचा असावा, ही आमची संकल्पना आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना तो शालेय अभ्यासक्रमात अधिक उपयुक्त ठरेल आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढू शकेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे याबाबत संबंधित वित्त आणि नियोजन विभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि हा उपक्रम राज्यात कशा पद्धतीने सुरु करावा याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.