राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देणारे निकाल समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सांगली जिल्ह्यामधील म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने दणका दिलाय. या ग्रामपंचायतीमध्ये मुसंडी मारली आहे. जयंत पाटील यांची सासरवाडी अशणाऱ्या म्हैसाळमधील १७ ग्रामपंचायतींच्या जागांवर पाटील यांचे सासरवाडीचे नातेवाईक म्हणजेच पाहुणे राऊळे उभे होते. मात्र राऊळेंचा पराभव झाला असून भाजपाने येथे एकतर्फी विजय मिळवलाय.
म्हैसाळमध्ये भाजपाने १७ पैकी थेट १५ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळवलाय. भाजपाच्या या विजयामुळे म्हैसाळमध्ये सत्तांतर झालं आहे. भाजपाने इथं एकहाती सत्ता मिळवलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सासरवाडीतच मोठा पराभव झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मारला जातोय. जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणिकीमध्ये पणाला लागली होती. मात्र पाटील यांचे धाकडे मेहुणे, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी असे सासरवाडीतील चारही उमेदवार पराभूत झालेत.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनाही बसला धक्का
सांगलीत भाजपाने बाजी मारली असली तरी दुसरीकडे कोल्हापूरमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये शिवसेनेचा भगवा फडला आहे. खानापूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत झालेली आघाडी निवडणुकीआधीच चर्चेत आलेली. मात्र चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं.