सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (ICU) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने कोल्हापूर (सर्किट बेंच) खंडपीठासमोर केला. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी न्यायालयाने आरोग्य विभागाला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

​न्यायमूर्ती ज.स. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. तसेच, आरोग्याच्या या गंभीर प्रश्नाकडे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी लक्ष घालावे असेही न्यायालयाने म्हटले.

​अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे वकील महेश राऊळ यांनी याप्रकरणी जोरदार युक्तिवाद केला. अभिनव फाउंडेशनने २०१३ मध्ये यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना मूलभूत वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, वकील राऊळ यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, गेल्या चार महिन्यांत १०८ रुग्णवाहिकेने ७४५ रुग्णांना बांबुळी, गोवा येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, खाजगी वाहनांनी गोव्याला गेलेल्या रुग्णांची संख्या यात समाविष्ट केल्यास हा आकडा खूप मोठा असेल. याचा अर्थ, दररोज किमान सहा रुग्ण उपचारांसाठी गोव्याला पाठवले जातात.

राऊळ यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोग्य विभाग ICU सुरू झाल्याचा दावा करत असला तरी, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. मूलभूत वैद्यकीय सुविधा नसल्यामुळेच रुग्णांना उपचारासाठी गोव्याला पाठवावे लागते. ३ ऑगस्ट २०२५ रोजी कारिवडे येथील परशुराम पोखरे नावाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू याच कारणामुळे झाला. वेळेवर रुग्णवाहिका मिळाली, पण उपचाराअभावी त्याला बांबुळीला नेतानाच त्याचा मृत्यू झाला. ही बाब अत्यंत गंभीर असून, सामान्य जनतेला न्याय कधी मिळणार, असा सवाल राऊळ यांनी उपस्थित केला.

​सरकारी वकील नेहा भिडे यांनी यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याचा अवधी मागितला. त्यांनी सांगितले की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ICU आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित झाले आहे आणि लवकरच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल.

​या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यावेळी सुनावणीस उपस्थित होते.