चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. असं असतानाच महाराष्ट्रामध्ये चीनमध्ये ज्या करोना व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाला आहे त्याच व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र राज्याचे आऱोग्यमंत्री तानाजी सावंतांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. चीनबरोबरच जगभारतील देशांमध्ये वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने सतर्क राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी नागपूरमधून करोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

“चीनमध्ये किंवा भारताबाहेर जे चित्र दिसत आहे, प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केलं आहे ते पाहून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यांनाही सांगितलं आहे की तुम्ही याबद्दल सतर्क राहा,” असं तानाजी सावंत म्हणाले. चीनमधील व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचं वृत्त खोटं असल्याचं तानाजी सावंतांनी स्पष्ट केलं. “काही प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर महाराष्ट्रात असे नवीन व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचं दाखवत असले तरी आमच्याकडे कुठल्याही अधिकृत आकडेवारीमध्ये असा रुग्ण सापडल्याची नोंद नाही. अशा बातम्या येत असतील तर आपलं डिपार्मेंट महाराष्ट्रभर सजग असलं पाहिजे,” असं तानाजी सावंत म्हणाले.

त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणाचा संदर्भ देत चीनमधील करोना प्रादुर्भावाने आपण घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. “या वेळेस घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. कारण कोव्हीडचा डोस एक, डोस दोन आणि ६०-६५ वर्षांवरील लोकांना बुस्टर डोस आपण दिलेला आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं अजिबातच कारण नाही. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा, आरोग्य सुवधा आणि करोनासंदर्भातील टीम सर्वजण तयारीमध्ये आहेत. त्याचाच एक आढावा घेणारी बैठक घेतली आहे. दोन दिवसांमध्ये आमच्याशी कम्युनिकेट करा आम्ही सुविधा पुरवू असं सर्वांना आम्ही कळवलं आहे,” असं सावंत म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

“ज्या देशांमध्ये बीएफ-७ व्हेरिएंटचे रुग्ण दिसतायत त्या देशांकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. या देशांमधून येणारे आपले पर्यटक असतील, उद्योजक असतील किंवा आपल्यातून गेलेले लोक परत आले असतील तर त्याचं थर्मल टेस्टींग करुन, १०० टक्के टेस्टींग करुन जर त्यांच्या स्वॅबमध्ये काही डिफेक्टीव्ह वाटलं तर लगेच त्यांना तिथेच आयसोलेट करा,” असे निर्देश देण्यात आल्याचं सावंत म्हणाले.

नक्की वाचा >> “काही लोकांना वाटलं पटापट विकेट पडतील पण मला…”; बंडखोरीची आठवण काढत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या डिपार्टमेंटला अगदी रुट लेव्हलपासून म्हणजे पीएचसीपासून (प्रायमरी हेल्थ सेंटर) आपल्या तालुक्याच्या जागा असतील किंवा जिल्हास्तरावर असेल. मेगा सिटी असतील, मोठी शहरं असतील, महानगरपालिकेतील विभाग असतील सर्वांना हीच गोष्ट पुन्हा सांगितली की टेस्टींग, ट्रॅकींग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन या चार स्टेप आहेत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी. ९५ टक्क्यांहून अधिक जणांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशापद्धतीच्या काही बातम्या आल्या तर घाबरुन जाण्याचं अजिबात कारण नाही. प्रशासन, शासन सतर्क आहे निर्णय घेण्यासाठी आपली यंत्रणा पूर्ण तयारीत आहे,” असं सावंत म्हणाले.