भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. राज्य आणि देशभरातून हजारो लोक येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. २०१८ साली काही कारणांमुळे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले होते. त्यानंतर झालेले शौर्य दिन शांततेत पार पडले आहेत. मात्र यावर्षी पुन्हा एकदा वाद निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केलेल्या एका मागणीमुळे वादाला तोंड फुटले आहे. तर सेंगर यांच्या वक्तव्याचा आरपीआय खरात गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.

काय म्हणाले करणी सेनेचे अजय सेंगर

अजय सेंगर यांनी साम या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्य दिन कसा काय साजरा होऊ शकतो. आम्ही मागणी करत आहोत की, गद्दारांचा शौर्य दिन साजरा होऊ नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत की, राज्य सरकारने बुलडोझर लावून पाडून टाकावा. ही जातीय लढाई नव्हती. ही इंग्रजांविरोधात केलेली लढाई होती. याला जातीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी देशातील समस्त हिंदू, बौद्ध यांना केली आहे. हिंदू-बौद्ध एकतेसाठी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या १ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी.”

हे ही वाचा >> पुणे: कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीची मोफत बससेवा

सेंगर पुजढे म्हणाले की, करणी सेनेकडून १ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभा घेणार आहे. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा भारतीयांनी उदो उदो करु नये, असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली राजकीय चूल पेटवण्याकरता या छोट्याश्या चकमकीला जातीय स्वरुप देण्यात आले, असाही आरोप सेंगर यांनी केला.

अजय सेंगर यांना अटक करावी, आरपीआयची मागणी

करणी सेनेच्या या मागणीनंतर आरपीआयकडूनही प्रतिक्रिया येत आहे. खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी लोकसत्ताशी बोलताना माहिती दिली की, “करणी सेनेची ही मागणी अत्यंत चुकीची आहे. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी १८१८ साली स्वाभिमानासाठी आणि जातीअंतासाठी पेशव्यामध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये महार सैनिकांचा विजय झाला. यामुळे हा भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहोत की, अजय सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी.”

हे ही वाचा >> पुणे: कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात यंदा ‘हिरकणी कक्ष’

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील या प्रकरणावर मत व्यक्त केले आहे. साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, “काही लोक भाजपाच्या पाठिंब्यावर अशी मागणी करत असतात. आता आमचे लक्ष भाजपाकडे लागले आहे. ते या विषयावर काय प्रतिक्रिया देतात, हे आम्ही पाहू.”