मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील पक्षीय उमेदवारांची दावेदारी अखेरच्या दिवशी निश्चित झाल्याने बडय़ा नेत्यांसाठी ही निवडणूक एक आव्हान ठरणार, हे स्पष्ट होते. भाजपचे रामदास आंबटकर, काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ , राष्ट्रवादी काँग्रेसचे सौरभ राजू तिमांडे, अपक्ष जगदीश टावरी हे वर्धा जिल्ह्य़ातील चार उमेदवार रिंगणात आहेत, परंतु थेट लढत भाजप विरुद्व काँग्रेस अशीच होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजपचे आंबटकर हे पक्ष संघटनेत व त्यापूर्वी संघाच्या प्रचारकार्यात राहलेले ज्येष्ठ नेते आहेत. सुरुवातीपासून त्यांच्या नावाचीच प्रबळ चर्चा होती, परंतु निवडणूक घोषित होताच धनदांडग्यांची नावे पुढे सरकू लागली. अखेर पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत आंबटकरांवर पसंतीची मोहोर उमटविली. आता आंबटकरांची उमेदवारी ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ  हे जिल्ह्य़ात काँग्रेस नेते म्हणून कधीच ओळखले गेले नाहीत. कधीकाळी तडजोडीच्या राजकारणात ते वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष झाले होते.  दोन तपापूर्वी नगराध्यक्षपद भाषवणाऱ्या सराफांना विधान परिषदेची मिळालेली उमेदवारी अद्याप पक्षवर्तुळात धक्केची बाब आहे. जिल्ह्य़ातील एकाही काँग्रेस नेत्याने त्यांना पुरस्कृत केले नव्हते. आताही बडा नेता त्यांच्यामागे नाही. काँग्रेसचे चंद्रपूरचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सराफांच्या गळय़ात उमेदवारीची माळ टाकली. वडेट्टीवार पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे, तर सराफांचे पुत्र राजेश सराफ  हे सेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख आहेत. यातूनच तार जुळले व सेना कुळाच्या संबंधातून सराफ  काँग्रेसचे उमेदवार झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्य़ात सराफ कुटुंबाचा पक्षनिष्ठावंत म्हणून परिचय कुणी देत नाही, परंतु एक बडे कंत्राटदार म्हणून त्यांची सर्वमान्य ओळख आहे. राकाँचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी पुत्राची उमेदवारी कायम ठेवत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे. नियोजन मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे सदस्य स्वत:कडे वळवून निवडून आलेल्या सौरभ तिमांडे यांची भिस्त भाजपमधील नाराजीवर आहे. वेगवेगळय़ा पक्षांचा अनुभव घेऊन आता अपक्ष लढणाऱ्या जगदीश टावरींची अन्य एक उमेदवार, अशीच संभावना होते.  आज भाजपमधील नाराजी काँग्रेसच्या उमेदवाराठी आधार ठरतेय. या नाराजीचा फोयदा मिळण्याची तसेच अपक्ष व सेना मतदारांची साथ मिळण्याची काँग्रेस उमेदवारास आशा आहे.

काँग्रेसचे सराफ  यांच्या वर्धा जिल्ह्य़ातील प्रचाराची सूत्रे हाताळणारे शेखर शेंडे हे म्हणाले की, या मतदारसंघात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. भाजपच्या मतांच्या दुप्पट विरोधी मते आहेत. काँग्रेसला बळकट करण्याची संधी म्हणून आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. चमत्कार घडेल.