१४ एप्रिल संध्याकाळपासून राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तो १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार असल्यामुळे आता पुढे काय? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला असून लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाउनच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “लॉकडाउनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही! राजेश टोपेंनी केलं जाहीर!

“सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रिमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये लस विकतच घ्यावी लागणार!

दरम्यान, यावेळी राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयांमध्ये लस विकतच घ्यावी लागणार असल्याचं स्पष्ट केलं. “खासगी रुग्णालयांमध्ये इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारच्या दवाखान्यांमध्येच फक्त लस मोफत मिळू शकणार आहे”, असं ते म्हणाले.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक तसेच जिल्ह्य़ाबाहेरील येणाऱ्या वाहनांना ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेतील (औषध वगळता) दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत लोकलच्या प्रवासावर निर्बंध आहेत. आता मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. म्हणून लॉकडाउनचा कालावधी वाढण्यावर विचार करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्राणवायूअभावी नागपूरसारख्या शहरात नवीन कोविड के अर सेंटरला परवानगी दिली जात नाही. रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन पुन्हा वाढणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या होत्या. खुद्द राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देखील लॉकडाउनची गरज व्यक्त केली होती. “लॉकडाउन कोणालाही आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाचा मारा सुरु राहिला तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाउन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lockdown extended by 15 days rajesh tope after cabinate meeting pmw
First published on: 28-04-2021 at 15:55 IST