सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे देशात करोनाचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला आहे. असं असलं तरी राज्याचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अशातच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असे संकेत दिले. “राज्यात आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्र पूण अनलॉक होईल. करोनावर अद्याप आलेली नाही. त्यामुळे आपल्याला आता करोनासोबतच जगावं लागणार आहे,” असं टोपे म्हणाले. त्यांनी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्वकाही अनलॉक केलं जाईल. पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू,” असं टोपे म्हणाले. “करोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला करोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही पाळलीच पाहिजे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

मृत्यूदर एक टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट्य

महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेली आयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलीआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी टेलीआयसीयूच्या शुभारंभप्रकरणी सांगितलं.

आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील करोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळं काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. राज्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra might fully unlocked till november says health minister rajesh tope coronavirus jud
First published on: 10-10-2020 at 10:33 IST