महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ शक्तीशाली भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गडचिरोलीच्या जनतेने नक्षलवादयांच्या दहशतीला न घाबरता मतदान केले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात लोकांनी मोठया हिमतीने मतदान केले त्या रागातून त्यांनी हा भूसुरुंग स्फोट घडवला असावा असा अंदाज  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बेसावध क्षणी हा हल्ला करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्याचा कितीही निषेध केला तरी कमी आहे असे मुनगंटीवार म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत नक्षलवाद्यांचे आव्हान मोडून काढणार. नक्षलवादाच्या या प्रश्नावर राजकीय अभिनिवेशनाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

बुधवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला.