Nagar Panchayat Election Result 2022 LIVE Updates: इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि महाविकास आघाडीला कोणाची ताकद किती याचा अंदाज येईल असं बोललं जात होतं. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.

भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरंपतायची आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलं आहे. नितेश राणेदेखील आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. तर रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.

राज्यातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करतानाच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. यानुसार भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या वर्गासाठी मंगळवारी मतदान पार पडलं.

Live Updates
10:39 (IST) 19 Jan 2022
धुळे – साक्री नगरपंचायतीचा पहिलाच निकाल हाती

धुळ्यातील साक्री नगरपंचायतीचा पहिलाच निकाल हाती आला असून अपक्ष उमेदवार कल्पना खैरनार यांनी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक एकचा निकाल आला आहे.

10:38 (IST) 19 Jan 2022
कवठेमहंकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; रोहित पाटील यांचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे. रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.

रोहित पाटील यांचं राष्ट्रवादी पॅनेल १०, तर शेतकरी विकास पॅनल ६ जागांवर विजयी, तर १ अपक्ष विजयी