एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यातून आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मनसे शिंदे गटाबरोबर युती करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनसेची शिंदे गटाशी युती होणार का? याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठ विधान केलं आहे. मनसे आणि शिंदे गटामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा- Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार

शिंदे गटाबरोबर युतीबाबत अमित ठाकरें म्हणतात…

अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला. समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार असून सत्तेत आल्यानंतर आम्ही ही यंत्रणा उभारणार असल्याचं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. आणि लवकरच आम्ही सत्तेत येऊ असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शिंदे गटाबरोबर युती करायची की नाही याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील असं उत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा- भेटीगाठी सुरूच! मनसे नेते संदीप देशपांडे ‘सदिच्छा भेट’ घेण्यासाठी ‘वर्षा’वर; नेमकी काय चर्चा झाली? तर्क-वितर्कांना उधाण!

मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम हाती

मनसेकडून महाराष्ट्रातील १४ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्र किेनाऱ्यांवर जमा होणारा कचरा साफ करण्याची मोहीम मनसेकडून हाती घेण्यात आली आहे. मनसेच्या या स्वच्छता मोहिमेत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले होते.

राज्यातील १४ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शनिवार सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे तर रत्नागिरीत सकाळी ८ ते १० दरम्यान मांडवी येथे मनसेतर्फे किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले.