Maharashtra Latest Marathi News, 25 july 2022 : राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी आहे. त्या आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षही तीव्र होत चालला असून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आजदेखील शिवसेनेतील अंतर्गत वादाच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळे भाजपा आणि शिंदे गट यांच्यातही खल होण्याची शक्यता आहे.
या घडामोडींसह राज्य तसेच देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
राज्य तसेच देशातील मुख्य घडामोडींसह सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
कोल्हापूरच्या पहिल्याच भेटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेऊ, अशी ग्वाही दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील या प्रश्नाची आपल्याला माहिती असल्याने त्याबाबतचा पाठपुरावा व्यक्तीने करू असे आश्वस्त केले.
ठाणे येथील कळवा खाडी किनारी भागातील खारफुटी क्षेत्रात बेकायदा बांधण्यात आलेल्या ५७ झोपड्यांवर ठाणे महापालिकेने सोमवारी पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. स्थानिक रहिवाशांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पालिकेने त्याला न जुमानता झोपड्या पाडण्याची कारवाई केली.
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. सविस्तर बातमी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या सात दशकांच्या कारकिर्दीला ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. ‘कार्टूनिस्टस् कम्बाइन’ ही मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होम्स ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून (२९ जुलै) भरविण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या व्यंगचित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील सत्तरहून अधिक मराठी व्यंगचित्रकारांची शब्दविरहित हास्यचित्रे रसिकांना पाहावयास मिळणार आहेत. व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे सरकारकडून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला या सरकारने स्थगिती दिली, असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये सोडतीद्वारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवैनिकांनी मोर्चा काढल्यानंतर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांवर टीका केली आहे. खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवाल त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे. तसेच तुमच्या भावना भडकवल्या जात आहे, याचा तुम्ही विचार करावा, असेही आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही काही प्रश्न विचारले आहेत.
करवेंद्रसिंग राघवेंद्रसिंग चव्हाण (वय २६, सध्या रा. बेल्हेकर वस्ती, मांजरी, मूळ रा. महू, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक केसनंद-थेऊर रस्त्यावर गस्त घालत होते. त्या वेळी एक जण पिस्तुल घेऊन तेथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चव्हाणला पकडले.
सीएनजी दरवाढीचा थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना बसणार आहे. इंधनातील दरवाढ लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात रिक्षाच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी दोन रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षा प्रवाशााला एक रुपया जादा भाडे मोजावे लागणार आहे. १ ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. वाचा सविस्तर बातमी...
आंध्र प्रदेशमधील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवण्यात आल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीने फेसबुकला शेअर केलेल्या व्हिडीओत महाराजांची मूर्ती असल्याने चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिलं नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान विधानसक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून निषेध व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील चेन्नई शहर स्वच्छ, सुंदर ठेवणारे कचरा पारुप लवकरच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत राबवून शहर स्वच्छ, सौंदर्यीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. शहर स्वच्छ ठेवणारा आदर्शवत असा प्रकल्प चेन्नई महापालिकेतर्फे शहरात राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी चेन्नई पालिका आयुक्तांसह घनकचरा अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. 'शिवसंवाद' यात्रेच्या माध्यामातून ते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ज्या ठिकाणी जातील, तेथून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडत आहेत. ते सातत्याने बंडखोर आमदारांचा उल्लेख 'गद्दार' असा करत आहेत. तसेच गद्दारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हानदेखील आदित्य ठाकरे करत आहेत.
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदरीत अशी स्थिती असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. सविस्तर बातमी
उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले. त्यावेळी आघाडी तोडा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आज भावना भडकवल्या जात आहे, त्या किती योग्य आहेत याचा विचार करावा. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, उद्धव ठाकरे यांनीच शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते.
संततधार पाऊस थांबल्याने पालिका अभियंत्यांनी दोन दिवसांपासून डोंबिवली, कल्याण परिसरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे शास्त्रोक्त पध्दतीने भरण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेऊन काही वेळ रस्ता बंद ठेऊन खड्डे भरणीची कामे केली जात आहेत.
मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (सोमवार) बिनशर्त मागे घेतली. न्यायालयात धाव घेण्याऐवजी सहकार मंत्र्याकडे दाद मागा, असे न्यायालयाने मुंबै बँक प्रकरणी विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते दरेकर यांना जून महिन्यातील सुनावणीच्या वेळी सुनावले होते. वाचा सविस्तर बातमी...
महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर राज्यामध्ये नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनीच एक मोठा खुलासा केलाय. केवळ ५० आमदारांचं समर्थन असूनही आपल्याला मुख्यमंत्री पद भाजपाने का दिलं यासंदर्भात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत भाष्य केलं. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामधील भाषणादरम्यान शिंदे यांनी कमी आमदार असूनही मोदींनी आम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला असं म्हटलंय. तसेच यामागील कारण काय होतं तेही भाषणात सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या नावे सध्या वाद सुरु असून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. स्मृती इराणी यांच्या कन्येकडून गोव्यात अवैध मद्यालय (बार) चालवलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. स्मृती इराणी यांनी हे आरोप फेटाळले असून हे आरोप निराधार असून, मुलीची तसंच आपली बदनामी केली जात असल्याचं म्हटलं आहे. जाणून घेऊयात हा नेमका वाद काय आहे आणि आतापर्यंत यामध्ये काय घडामोडी घडल्या आहेत.
‘तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही, तुम्ही चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडीन, लक्षात ठेवा’, अशा शब्दात माजी मंत्री आणि तिवसाच्या कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिका-यांना दम दिला आहे. या घटनेची चित्रफित सध्या प्रसारित झाली आहे. तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना यशोमती ठाकूर यांनी हा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना आज(सोमवार) घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर बातमी...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिल्लीत बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. त्यामुळे अर्जून खोतकर ठाकरे गटातून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यानंतर अर्जून खोतकर शिंदे गटात जाणार का? या प्रश्नावर स्वतः खोतकरांनीच भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२५ जुलै) दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर आता नगरपालिकांमधील प्रभाग आरक्षणात ओबीसींचा समावेश करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिका असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर पालिकांमध्ये येत्या २८ जुलै रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये पुन्हा धाकधुक वाढली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत १४ तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेत १२ जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे काल(रविवार) निधन झाले. यामुळे आता चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या कोल्हापुरमधील निवासस्थानी नेते मंडळींची तसेच नागरिकांची रीघ लागली आहे. असे असताना आज(सोमवार) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...
मागील काही दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगरे, कोकण, मध्य महाराष्ट्र यांच्यासह राज्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेलं शेतजमीन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह या मुद्यावर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात यावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी या पत्रातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रातून केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेतल्याचं सांगत मुलाखतीच्या पहिल्या भागाचा ट्रेलर पोस्ट केला. आज (२५ जुलै) राऊतांनी ठाकरेंच्या दुसऱ्या मुलाखतीचा ट्रेलर पोस्ट केला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीनंतर ते स्वतः सुरतला गेले असते तर पासून विश्वासमत ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं दिल्याचं दिसत आहे.
तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. गावातील २०६ कुटुंबे महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साह्याने तंबू उभारून तेथे वास्तव्याला आहे. आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...
शिंदे सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड कांजूरऐवजी आरे वसाहत परिसरात उभारण्याची घोषणा केल्यानंतर वादाची ठिकणी पडली असतानाच आज (सोमवार) सकाळी आरेतील रस्ते २४ तासांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर तत्काळ या परिसरातील रस्त्यांवरील झाडांची छाटणी सुरू करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...
भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणाबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत राहिलं. गडकरींनी "मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं", अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. नितीन गडकरी म्हणत आहेत ते खरं असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. तसेच राजकारण फक्त सत्तेसाठी करायचं नसतं, असंही नमूद केलं.
breaking news live update