Maharashtra Political News : राज्यातील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यातच राज्यातील नगरपरिषदा आणि काही नगरपंचायतींच्या निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोळाबद्दल राहुल गांधींनी केलेल्या दाव्याचे पडसादही राज्यातील राजकारणात उमटताना दिसत आहेत.
१) “अजित पवार बेधडकपणे सांगतायत, शेतकऱ्यांनो हातपाय हलवा, मग तुम्ही…”, उद्धव ठाकरेंचा टोला
कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक विधान केलं होतं. “आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही जनतेला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं”, तसेच “सारखी कर्जमाफी मागण्यापेक्षा तुम्हीसुद्धा हातपाय हलवले पाहिजेत,” असे अजित पवार म्हणाले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पूरग्रस्त गावांना भेटी देताना आज (५ नोव्हेंबर) त्यांनी बीडमधील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अजित पवार बेधडकपणे सांगत आहेत की आम्हाला निवडणुकीत जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आमच्यासमोरही अडचणी आहेत. त्यामुळे तुम्ही जरा हातपाय हलवा. अहो, अजित पवार तुम्ही कोणाला हातपाय हलवायला सांगताय?”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय. हातपाय हलवूनही त्यांच्यावर संकट ओढवलं आहे. आपत्तीच इतकी मोठी आली आहे की हलवले जाणारे हात आता तो कपाळावर मारायची वेळ आली आहे. त्या शेतकऱ्याला तुम्ही हातपाय हलवायला सांगताय. मग तुम्ही काय करताय? तुम्ही सरकार हलवताय ना? मी काही वेडंवाकडं बोलत नाही. मी अजित पवारांना विचारलं की तुम्ही सरकार हलवताय ना?”
२) “हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडाचा हल्ला”; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा गंभीर आरोप
आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.त्यानंतर आता धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला आहे’, असा गंभीर आरोप करत धंगेकरांनी नवी पोस्ट शेअर केली आहे.
“पौडफाटा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहळांच्या गुंडाचा हल्ला.. मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत तीस ते चाळीस साथीदारांसह मेगा सिटी वस्तीमध्ये घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांसह वस्तीतील महिलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो, बाकी गुन्हेगारीची पाळेमुळे इथेच आहेत”, असं रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“रफिक नावाच्या एका व्यक्तीने एका वस्तीतील काही महिलांना मारहाण केली. हा रफिक नावाचा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचा सरचिटणीस आहे. त्यांचं अभिनंदन केल्याचं पत्र आणि फोटोही मी पोस्टमध्ये टाकले आहेत. हाच व्यक्ती कोथरूडमध्ये काही बिल्डरांबरोबर काम करतो”, असं रवींद्र धंगेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
३) “राहुल गांधींचा डेमो बघून भाजपाचे डोळे उघडतील”, रोहित पवारांची भाजपावर टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माझी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन हरियाणातील विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा नवा हायड्रोजन बॉम्ब टाकला. भाजपा व निवडणूक आयोगाने संगन्मताने २५ लाख मतांची चोरी केल्याचा दावा देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला. यावरून रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे.
“बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर २२ वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
४) “उद्धव ठाकरे टोमणे मारण्यापलिकडे काहीही करु शकत नाहीत”, फडणवीसांचे प्रत्युत्तर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केली होती. याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. तिन्ही पक्ष आपल्या आपल्या स्तरावर निर्णय घेतील. काही ठिकाणी युती झाली नाही तरीही आम्ही नंतर एकत्र येऊ. महायुतीला जनता कौल देईल. उद्धव ठाकरे पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काही करु शकत नाही. मी तर यापूर्वीही सांगितलं आहे की विकासावर केलेलं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
५) “सदोष मतदार यादीसह निवडणुका घेण्याचा घाई का आहे?” सुप्रिया सुळेंचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मतदार याद्यांतील घोळ आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे यावरून काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, “महाराष्ट्रातील मतदारयादीतील घोळाबाबत महाविकास आघाडी, मनसे आणि मित्रपक्षांनी निवडणूक आयोगाला दिल्लीत जाऊन निवेदन दिले. मतदारयादीतील घोळ आम्ही निवडणूक आयोगाला दाखवून देत असताना, पुरावे दाखवत असताना समोरुन आम्हाला ना होकार आला, ना नकार. आम्ही सर्वजण मोठ्या आशेने निवडणूक आयोगाकडे गेलो होतो पण आमच्या पदरात निराशाच आली. दुर्दैव आहे की, आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे एवढे पुरावे सादर केले पण आयोगाने आमची दखल घेतली नाही, हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक आणि चिंताजनक आहे. “
त्याचबरोबर आज राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडण्यात आले ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी फाईल एच या नावाने जे काही मांडलं ते वस्तुनिष्ठ पद्धतीने आकडेवारीसह मांडलेलं आहे. एक बाहेरच्या देशातील व्यक्तींची मतदारयादीत एवढ्या वेळा नोंद होते आणि ती मतदान देखील करते हे सर्व अक्षरशः हास्यास्पद आहे. निवडणूक प्रक्रीयेतील हे घोटाळे माध्यमांनी अवश्य प्राधान्याने मांडले पाहिजेत. दुबार मतदान रोखणे भारत सरकारला शक्य आहे पण त्यासाठी पुढाकार का घेतला जात नाही हे कळत नाही. निवडणूक आयोगाला आम्ही एवढा डेटा दिला आहे, पण निवडणूक आयोग याबाबत काहीही बोलत नाही. ज्याअर्थी एखाद्या गोष्टीबद्दल आपण काहीही बोलत नाही याचा अर्थ आपले त्याला समर्थन असते असा अर्थ होतो.
“गेली सात वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत नव्हत्या परंतु जशी मतदार यादीतील घोळाबाबत आम्ही आवाज उठविला. या आरोपांची धार वाढत गेली, निवडणुका जाहीर करण्यात आल्या. उशीर झालाच होता तर मतदार यादीतील घोळ दूर करुन निवडणुका घेता आल्या असत्या, त्यांना सदोष मतदारयादीसह निवडणुका घेण्याचा घाई का आहे?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.
