Maharashtra Politics Top 5 Political statements : राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या हलचालिंना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यातील विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला आहे. मतदार याद्यांमधील सुधारणांसाठी विरोधक एकत्र आले असून त्यांच्याकडून हा मुद्दा सातत्याने लावून धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज कोण काय म्हणालं याचा आढावा आपण दिवसभरातील पाच महत्त्वाच्या विधानांमधून घेणार आहोत
‘नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने झालेले मुख्यमंत्री’; राऊतांची फडणवीसांवर टीका
महाविकास आघाडीचे नेते तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या विरोधी पक्षांनी मतदार याद्यातील घोळासंबंधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी टीका केली होती. इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत. इतके मोठमोठे लोक त्यांना कुणाकडे गेलं पाहिजे? कायदा काय सांगतो हे माहीत आहे की नाही माहीत नाही, असे फडणीस म्हणाले. यावर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. “यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक मतदार यादीत घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणे… देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही. त्यांना कोणी वकील केलं आणि त्यांनी कधी वकिली केली हे कळायला मार्ग नाही. नरेंद्र मोदी यांच्या मेहरबानीने झालेले या देशातील जे मुख्यमंत्री आहेत, त्यातले ते एक आहेत. कतृ्त्त्वावर नाहीत…. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाबाबत त्यांनी असं विधान केलं नसतं,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“राज ठाकरेंच्या मनसेला बरोबर घेण्याचा प्रस्ताव…”; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या निवडणुकीत एकत्र लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत घेण्याला काँग्रेसने विरोध केल्याचे बोललं जात आहे. यादरम्यान आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याबद्दल भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी माझी तक्रार आमच्या हायकमांडकडे केली आहे वगैरे याची काही मला कल्पना नाही. मनसेसंदर्भातला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत त्याबाबत सर्वपक्षीय पक्षांना बोलवलं होतं. भाजपालाही निमंत्रण पाठवलं होतं. बिहार निवडणूक आणि याचा तसा काही प्रश्न नाही. मतचोरीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. त्यावर सगळेच पक्ष तुटून पडत असतील तर चांगलंच आहे. आमचे मित्र पक्ष त्यावर बोलत असतील आणि इतरांना बोलवत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या मनसेबाबत सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबत चर्चा होतील. त्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देता येईल. असा कुठलाही प्रस्ताव नसल्याने याबाबत आत्ता काही बोलणं योग्य ठरणार नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
बुलढाण्यात १ लाखाहून अधिक बोगस मतदार
मतदार याद्यांमधील घोळाबाबत शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बोगस मतदारांवर भाष्य केले आहे. “बुलढाण्यामध्ये जवळपास ४ हजार डबल नावे बोगस असल्याचे आम्ही कलेक्टरांना लेखी कळवले आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघवले यांना मी फोन केला, तीस-तीस वर्षांपूर्वी राहून गेलेल्या अधिकार्यांची आणि मृत्यू झालेल्यांचीही नावे तशीच आहेत. हा आकडा जिल्ह्यात लाखापेक्षा अधिक आहे. निवडूक आयोग म्हणतं ही नावे काढू नका, अरे ही डबल असलेली नावे तुम्ही का काढत नाहीत? भारतात असा कोणता कायदा आहे की तुम्ही अशी बोगस नावे कायम ठेवता. २५ जुलै रोजी तुम्ही सांगितलं की नावे काढूही नका आणि टाकूही नका, मग कालपर्यंत ज्या मुलांना मतदानाचा अधिकार आला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकावून घेत नाहीत का?” असे संजय गायकवाड म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंनी घोषित केलेल्या योजना बंद?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अशा आठ योजनांची यादीच जाहीर केली होती. आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आणखी १० योजना बंद झाल्याचे म्हटले आहे.
“या आणखी बंद योजना..
१. नमो महिला सशक्तीकरण योजना – बंद
२. नमो कामगार कल्याण योजना – बंद
३. नमो शेततळे अभियान – बंद
४. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना – बंद
५. नमो ग्राम सचिवालय योजना – बंद
६. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना – बंद
७. नमो दिव्यांग शक्ती योजना – बंद
८. नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना – बंद
९. नमो शहर सौंदर्यीकरण योजना – बंद
१०. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना – बंद
या आहेत एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घोषित केलेल्या योजना! असो.. विषय हा आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन जन्मदिवस शिंदेंनी (घटनाबाह्य) मुख्यमंत्री म्हणून साजरा केले. तेव्हा या कटप्रमुखांना अश्या योजना घोषित कराव्या वाटल्या नाहीत? का बरं? शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते,” असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.
“मी रामदास कदम यांचा मुलगा, मला…”, विरोधकांच्या टिकेवर गृह राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांत विविध प्रकरणांमुळे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात देखील कदम यांच्यावर आरोप झाले. लक्ष्या करण्यामागे राजकारण आहे की आपलेच कोणी करत आहेत, असे विचारले असता योगेश कदम म्हणाले,
“मला काहीच फरक पडत नाही. आपले कोण असूद्यात किंवा हे विरोधक राजकरण करत असूद्यात. माझं लक्ष्य हे फक्त माझ्या कामावर आहे. माझं लक्ष्य माझ्यावरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे याकडे आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं, यावर मी अजिबात लक्ष्य देत नाही. अशा टीकेला मी घाबरत नसतो. शेवटी मी रामदास भाईंचा मुलगा आहे. लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे, त्यामुळे कोण काशासाठी करतंय हे देखील माहिती आहे, पण यामुळे मला काही फरक पडत नाही,” असे योगेश कदम म्हणाले.