Maharashtra Politics Top 5 Political statements : महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (उबाठा) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तर कोकणात महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत सातत्याने महायुतीतील मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत आहेत. तर, मुंबईत शिवसेना (उबाठा) व मनसे नेते महापालिकेसाठी तयारी करत आहेत.

दुसऱ्या बाजूला, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर हे भाजपा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जैन संघटना, पुणेकर व शिवसेनेचा ठाकरे गटही धंगेकरांबरोबर उभा आहे. या अनुषंगाने आज दिवसभरात चर्चेत आलेली पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात.

“महायुतीविरोधात पिल्लावळ प्रयत्नशील”, सामंतांची मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका

विधानसभेच्या निवडणुकीला जर शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले नसते तर काय परिस्थिती झाली असती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही माहिती आहे. निवडून आलेल्या उमेदवारांना ही माहिती आहे, आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, असा टोला त्यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना लगावला. याच पार्श्वभूमीवर चिपळूण येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते व पालकमंत्री उदय सामंत महायुतीमधील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत असं सांगत असतानाच महायुतीमधीलच काही पिल्लावळ महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, शिवसेना काय आहे हे तितक्याच आक्रमकपणे दाखवून देण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांच्या समाचार घेतला आहे.

नवनीत राणांची राज ठाकरे व उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई, ठाण्यासह पाच महापालिका एकत्र लढण्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकमत झालं आहे. ५ जुलैला मराठी विजयोउत्सवाच्या निमित्ताने दोन भाऊ एकत्र आले. त्यानंतर मागील तीन महिन्यांत त्यांच्या सहा भेटी झाल्या आहेत. दरम्यान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे कुटुंब हे मजबुरीचं नाव आहे असंही त्या म्हणाल्या.

नवनीत राणा म्हणाल्या, परिवार एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे आणि आपण ती जपली पाहिजे… पण आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे दोन भाऊ एकत्र आले ते फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी…सत्तेत आल्यानंतर फक्त पैशासाठी आणि तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले आहेत.

भाजपा अजित पवारांना धक्का देणार? संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

भाजपाकडून मित्रपक्षाचेच नेते फोडले जात असल्याबाबत शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजपात एक हिंदीतील म्हण प्रसिद्ध आहे. ‘ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपाने ठगा नही’ अजित पवार त्यांच्यासमोर किस झाड की मुली है.

‘मी मोदी भक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची टीका

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलत असताना मी भाजपाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त असल्याचे म्हटले होते. तसेच मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असे विधान केले होते. यावरून शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत.”

संजय राऊत गंमतीत म्हणाले, “तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.”

मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारीवर बोलावं : रवींद्र धंगेकर

पुणे शहरातील शनिवारवाड्यामध्ये चार दिवसांपूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपाच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केले. संबंधित महिलांवर कारवाई करावी, तसेच शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “पुणे महानगरपालिकेमध्ये मी आणि मेधा कुलकर्णी दोघांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्या कामाची पद्धत माहीत आहे; पण आता मेधा कुलकर्णी या खासदार असून, त्याप्रमाणे त्यांनी काम केले पाहिजे. तसेच मेधा कुलकर्णी या कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्या भागासह पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. जैन समाजाची कोट्यवधी रुपयांची जमीन तुमच्या पक्षातील एका नेत्याने गहाण ठेवण्याचे काम केले. त्यासह अनेक समस्यांना पुणे शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ते प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्यावरदेखील मेधा कुलकर्णी यांनी बोलले पाहिजे; पण त्यावर मेधा कुलकर्णी बोलत नाहीत.”