Maharashtra Politics Todays Top 5 Stories : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर आणि भाजपाचे नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सहभागी करायचं की नाही? यावरून काँग्रेस पक्षात दोन मते असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या राजकीय वक्तव्यांचा आपण आढावा घेणार आहोत.

1) “आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचं होतं”, संजय राऊतांचं वक्तव्य

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना बरोबर घ्यायचं की नाही यावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना बरोबर न घेता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असे म्हटले आहे. तर काँग्रेस दुसरे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीत स्वागत केलं आहे. भाई जगताप म्हणाले होते की “मुंबईत काँग्रेसचा महापौर बसेल.” यावर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता. परंतु नाही होऊ शकला. आम्ही काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठीच इंडिया आघाडीची निर्मिती केली होती. कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं होतं. तेव्हा आम्ही असं म्हणालो नाही की आम्हाला शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे.”

2) रवींद्र धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांनी दिलं उत्तर!

पुण्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपाचे प्रमुख नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी विशाल गोखले यांच्या जीबीबी प्रकल्पातील सुविधांबाबत माहिती देतानाचा मोहोळ यांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर “कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे”, अशी पोस्ट धंगेकरांनी केली होती. शिवाय, “कंपनीच्या भविष्यातील ३० हजार कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का?” असा प्रश्नही त्यांनी पोस्टमध्ये विचारला होता. आरोपांना आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“विशाल गोखले माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे. ५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो. पण तो ५ वर्षांपूर्वीचा आहे. तो काही काल-परवाचा नाही. जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा आणि मग बोला. कुणी कुणाची जाहिरात केली तर काय व्यवसायात भागीदार होतं का? या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. एक माणूस या संस्कृतीची वाट लावत आहे”, अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

3) “…देशाची लोकशाही धोक्यात येईल,” फडणवीसांची काँग्रेसवर सडकून टीका

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. “काँग्रेसचे नेतृत्व अनेकांनी केले आहे. परंतु, इंदिरा गांधींच्या काळातही काँग्रेस कधीच डाव्या विचारांचा पक्ष झालेला नव्हता. मात्र, आज राहूल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने सरकारवर टीका करणे सोडून या देशातील संविधानित संस्थांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. हे या देशातील लोकशाहीसाठी चुकीचे आहे. आपल्याच संस्थांचा विरोध करणे गैर आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुढे उदाहरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय हा काँग्रेस पक्षाच्या बाजून दिला तर त्यावेळी त्यांचा या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास असतो. याउलट जर राहूल गांधींच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यास आपल्या देशातील न्यायव्यवस्था कशी सरकारधारजीनी आहे असे सांगत फीरतात. हे देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. आपल्या देशातील संस्थांविषयी येणाऱ्या पिढीमध्ये अशी नकारात्मकता पसरत गेल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल.”

4) “ठाकरे हा फक्त ब्रँड नाही, तर…”; मनसे नेते अविनाश जाधवांची पोस्ट चर्चेत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांत वारंवार एकत्र आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी समाज माध्यमांवर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. “ठाकरे हा फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसासाठी लाईफ टाइम गॅरंटी आहे” अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ४ महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची १० वी भेट आहे.

5) “मुंबई एकत्रच लढणार”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये निवडणुकीसाठी महायुतीचे काय धोरण असेल? याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही तिघांनीही मिळून असा निर्णय घेतला आहे की ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे, त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढले पाहिजे. मात्र, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. मुंबई महानगर पालिकेत महायुतीला १०० हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही नक्कीच पार करू. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर असेल.”

“मुंबईत आम्ही एकत्र लढणार असलो, तरी ठाण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. जर ते म्हणाले युतीत लढू, तर युतीत अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाऊ”, असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.