अलिबाग– गणेशोत्सव तोंडावर राज्यसरकारने प्लास्टीक फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने, व्यवसायिकांची कोंडी झाली आहे. कृत्रिम फुलांच्या बाजार बहरात येण्याआधीच कोमेजण्याची धास्ती व्यवसायिकांना वाटत आहेत. तर गणेश भक्तांसमोर नेमका कशाचा करायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे.
थर्माकोलच्या आरास आणि मखरांवर यापुर्वीच बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गणेशोत्सवात आरासासाठी कृत्रिक प्लास्टीकच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. गणेशोत्सवा दरम्यान या फुलांना मोठी मागणी होत होती. ज्यातून करोडो रुपयांची उलाढाल होत होती. मात्र आता राज्यसरकारने प्लास्टीक फुलांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन हंगामात प्लास्टीक फुलांवर बंदी आल्याने, व्यवसायिक मात्र अडचणीत सापडले आहेत.
गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपल्याने, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या कृत्रिम फुलांची मागणी नोंदवली होती. बराचसा माल दाखलही झाला होता. विक्रीसाठी तयार मालाचे आता करायचे काय असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या खऱ्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फूल उत्पादक शेतकऱ्याना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अलिकडच्या काळात बहुतांश कार्यक्रम, समारंभ, मंगल कार्यालय,मंदीरं, उत्सवात प्लास्टीकच्या कृत्रिम बनावटीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागल्याने, शेतकऱ्यांकडून उत्पादीत खऱ्या फुलांना उठाव मिळत नव्हता. त्यामुळे खऱ्या फुलांचा अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय अडचणीत आला होता. ज्यामुळं शेतकऱ्याकडून कृत्रिम फुलांची विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा राज्यात प्लास्टीक फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
खऱ्या फुलांच्या तुलनेत किंमती कमी असल्यामुळे या दिवसांत प्लास्टिक फुलांना मागणी वाढलेली असते. शिवाय कायम टवटवीत दिसतात. खरी फुले एक ते दोन दिवसात कोमेजून जातात. त्यामुळे ग्राहकांचा प्लास्टीक फुलांकडे कल जास्त असतो. दररोज नैसर्गिक फुले बदलणे शक्य नसते. त्यामुळे उत्सव काळात कृत्रिम फुलाांचा आधार घेतला जातो. मात्र, प्लास्टिक फुलांवरील बंदीमुळे घरगुती सजावट करणारया गणेश भक्तांची पंचाईत झाली आहे.
गणेशभक्तांसमोर पेच
कोकणात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. सार्वजनिक उत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सवात सजावटीवर भर असतो. अनेक ठिकाणी घरगुती गणेश सजावट स्पर्धादेखील आयोजीत केल्या जातात. त्यामुळे आपल्या बाप्पांची आरास अधिक आकर्षक आणि मनमोहक कशी दिसेल यावर गणेश भक्तांचा कल असतो. त्यासाठी प्लास्टीकची पाने फुले यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला केला जातो. मुंबईतून येणारे गणेशभक्त येतांना क्रॉफर्ड मार्केट मधऊन हे सजावटीचे साहित्य सोबत घेवून येत असतात. यात प्रामुख्याने प्लास्टीक फुलांचा समावेश असतो. आता बंदीमुळे सजावटीसाठी कुठला नवीन पर्याय निवडायचा असा पेच या गणेश भक्तांसमोर उभा आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मुंबईहून कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणात आणून ठेवली आहेत. प्लास्टिक फुलांच्या बंदीमुळे आणलेल्या या फुलांचे काय करायचे हा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या बंदीमुळे दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. काहीतरी सवलत देऊन ही बंदी लांबवावी. आम्ही घाऊक प्रमाणात प्लास्टीकची पानं फुलं तसेच सजावटीच्या वस्तू आणल्या आहेत. – सोहनमल जैन, प्लास्टिक व आर्टिफिशियल फूल विक्रेता,