ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा आज रस्त्यावर उतरला आहे. भाजपाने चक्क जाम आंदोलनाची हाक देत सकाळी आंदोलन सुरू झालं. राज्यभरात आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथीच्या कोल्हापूरातील उपकेंद्राचं उद्घाटन केलं. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे,” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असं विधान केलं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा रोख कुणाच्या दिशेने होता, याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा-…आम्ही पण बघून घेऊ; संजय राऊत भाजपावर भडकले

सारथी उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांचं कौतुक करत मराठा समाजाचे आभार मानले. “न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना टोला लगावला.

हेही वाचा- यांना त्यांच्या बायकोनं जरी मारलं, तरी मोदींना जबाबदार धरतील; फडणवीस कडाडले

“आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं, तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायचे आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याही प्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो,” असं मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमप्रसंगी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra politics bjp chakka jam protest devendra fadnavis pankaja munde uddhav thackeray slam fadnavis bmh
First published on: 26-06-2021 at 15:04 IST