Shivsena vs Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे.

त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या आमदारांना चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Live Updates

Eknath Shinde, Maharashtra Political crisis Live Updates: एकनाथ शिंदे बंडखोरी, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे सर्व अपटेड एकाच क्लिकवर

09:32 (IST) 22 Jun 2022
आमची काँग्रेस, राष्ट्रवादीवर नाराजी- संजय शिरसाठ

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हळुहळू सगळे आमदार जमा होत आहेत. दुपारपर्यंत हा आकडा ४६ च्या पुढे जाईल. यामध्ये शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर नाराजी आहे. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी नाही. भाजपाच्या साथीने पुढे जाणार; की राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जुळवून घेणार? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे संजय शिरसाठ यांनी सांगितले.

09:19 (IST) 22 Jun 2022
शिवसेनेने निवडलेला गटनेता नियमबाह्य- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा प्रस्तावावर चर्चा झाली नाही. चर्चा करायला येत असताना मी कुठलेही पक्षविरोधी काम केलेले नाही. असे असताना मला गटनेतेपदावरून काढलं. मला बदनाम केलं जातंय. याबद्दल मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. हे बरोबर नाही असं सांगितलं. आमदारांच्या मनातील भावना मी तुमच्याकडे याआधीही मांडलेली आहे, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. शिवसेनेने निवडलेला गटनेता हा नियमबाह्य आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे ही निवड अवैध आहे. हा कायदेशीर मुद्दा होऊ शकतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

09:16 (IST) 22 Jun 2022
माझ्याकडे चाळीसपेक्षा जास्त आमदार- एकनाथ शिंदे

माझ्यासोबत जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जीने आमदार आमच्यासोबत आहेत. जवळपास चाळीसपेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत.

09:15 (IST) 22 Jun 2022
मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक- एकनाथ शिंदे

कालही मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब आमच्यासाठी आदर्श आहोत. काल आज आणि उद्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमची भूमिका सुरुवातीपासूनच हिंदुत्त्वाची होती. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

09:13 (IST) 22 Jun 2022
शिवसेना सोडण्याचा निर्णय नाही- एकनाथ शिंदे

अद्यापतरी शिवसेना सोडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही. सत्तेसाठी आम्ही हिंदुत्ताशी तडजोड करणार नाही. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांच्या विचाराचे आमदार आज माझ्यासोबत आलेले आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे राजकारण पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

09:11 (IST) 22 Jun 2022
एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात असे एकूण चाळीस आमदार आहेत. या सर्व आमारांना घेऊन शिंदे सुरतहून गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे