१४ वर्षांतील बेपत्ता आप्तांबाबत नातेवाईकांची पोलिसांत धाव
बोगस डॉक्टर संतोष पोळ याने सहा खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या संपर्कातील आणखी चारजण बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली. पोळने या चारजणांचीही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
पोळ याने सहा खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरोधात आणखी चौघांजणांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दीपाली किसन सणस (आसरे, ता. वाई ) ही २००२ पासून, शैलेश गोवंडे (मेणवली, ता. वाई ) हा २०१० पासून, शामराव दुधाने (ओंड, ता. जावली ) हे १४ ऑगस्ट २०११ पासून तर रमेश पवार (धोम कॉलनी, वाई) हे २०१३ पासून बेपत्ता आहेत. हे सर्व जण संतोष पोळच्या संपर्कातील असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागेही त्याचाच हात असल्याचा संशय या तक्रारींमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोळ व त्याच्या साथीदार महिलेला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. या आरोपींना पोलिसांनी अज्ञातस्थळी हलवले असून त्यांच्या चौकशीबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
दरम्यान, पोळ याच्या शेतघराभोवती मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांच्या तपासकामात अडथळे येत आहेत. सध्या या जागभोवती मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संतोष पोळ याची ‘नार्को टेस्ट’ करा, अशी मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे. अशी चाचणी केल्यावर पोळ याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, तसेच अनेक बेपत्ता व्यक्तींचा शोध लागू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.
विक्षिप्त आणि फटकळ
संतोष पोळचे नातेवाईकांशी फारसे संबंध नव्हते. लोकांशीही तो फटकून वागे. वाईतील एका खासगी रुग्णालयात तो काम करीत होता आणि तेथे संप घडवून आणल्यामुळे त्याला २०१५मध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाने त्याला रुग्णवाहिका दिली होती. २५ जुलै २०१५ रोजी तो रुग्णवाहिकेसह फरारी झाल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल होती.