राज्य सरकारतर्फे दिला जाणारा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.  तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.

राज्याचे सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना , श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्यातील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यादरम्यान रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.

यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे ते मराठी अभिमान गीताचे समूहगायन. विधानभवन परिसरात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य मान्यवर मंडळी समूहगीताचे गायन करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.