मुंबई/पुणे : उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आल्याने महाराष्ट्रातही तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सुरुवातीला थंडी अवतरली आहे. तापमानातील घट आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे निर्माण झालेली पावसाळी स्थिती आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने डिसेंबरमध्ये झाकोळलेली थंडीची कसर जानेवारीत भरून निघणार असल्याचा दीर्घकालीन अंदाजही भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे.

राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले असून पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. काही भागांत दाट धुके  आहे.

राजस्थानमध्ये काही भागांत २ अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे. या भागातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रातही तापमानात घट होत आहे. पुढील दोन-तीन दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील.

नाशिक येथे सर्वात कमी तापमान : नाशिक येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच, औरंगाबाद १०.४, पुणे १२.५ नांदेड १६.४, सातारा १४.९, जळगाव ११, सांगली १७.३, मालेगाव १७, परभरणी १६.५, बारामती १३.८, डहाणू १७.३, सोलापूर १७.६, उदगीर १६.५, रत्नागिरी २०, माथेरान १५.२, ठाणे २२, उस्मानाबाद १६, अकोला १५.९, अमरावती १५.५, बुलढाणा १४.२, गोंदिया १४.५, नागपूर १५.६, यवतमाळ १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईत हुडहुडी

नाताळदरम्यान हुडहुडी भरवणारी थंडी दोन दिवसांत गायब होऊन पुन्हा तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. गेल्या गुरुवारी मुंबईतील कमाल तापमान ३३ अंशांहून अधिक वाढल्याने  नागरिकांना हैराण केले. मात्र, आता मुंबईकरांना नववर्षांच्या सुरुवातीलाच थंडगार वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस, कुलाबा येथील १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाने केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra temperature dropped due to cold wave in north india zws
First published on: 02-01-2023 at 01:44 IST